शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईत सरकारी कोलदांडा, भाजीपाला सडला, भातपिकांना कोंब फुटले तरी पंचनामे होईनात; अप्पर तहसीलदार म्हणतात भाईंदरमध्ये एकाही शेतकऱ्याचे नुकसान नाही

परतीच्या पावसाने भाईंदरमधील शेकडो एकर शेतीचे नुकसान झाले असून अनेक दिवस भातपिके पाण्यात राहिल्याने त्यांना कोंब फुटले आहेत. तसेच भाजीपाला, पांढरा कांदादेखील सडला आहे. मात्र असे असताना भाईंदरमधील शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईत सरकारीच कोलदांडा आडवा आला असल्याचे समोर आले आहे. शासनाच्या नियमानुसार 65 मिलीमीटरच्या पुढे पाऊस झाल्यास अतिवृष्टी नोंदवली जाते, असे अप्पर तहसीलदार नीलेश गौंड यांचे म्हणणे आहे. तसेच भाईंदरमध्ये एकही शेतकरी बाधित नसल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होऊनही नुकसानभरपाई मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

भाईंदर पश्चिमेच्या राई, मुर्धा, मोर्बा, उत्तन, डोंगरी, तारोडी, घोडबंदर, चेना व काजुपाडा भागातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटाने हातातोंडाशी आलेली भातशेती, पांढरे कांदे व भाजीपाला मळ्यांचा अक्षरशः चिखल झाला आहे. शेतांमध्ये पाणी तुंबल्याने भातपिकांना कोंब फुटले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी आवाज उठवल्यानंतर उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी अप्पर तहसीलदार निलेश गौंड यांना तत्काळ नुकसानभरपाईचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. मात्र अप्पर तहसीलदारांनी भाईंदरमध्ये एकही शेतकरी नुकसानबाधित नसल्याचे सांगितले आहे.

प्रशासनाचे नेमके काय म्हणणे आहे?
शासनाच्या निर्देशानुसार 65 मिलीमीटरच्या पुढे अतिवृष्टी नोंदवली जाते, त्यानुसार बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे केले जातात व त्यांना नुकसानभरपाई दिली जाते. सध्या मीरा-भाईंदर एकही शेतकरी नुकसान बाधित झाला नाही, तरी कुठेही नुकसान झाले असल्यास संबंधित तलाठ्यांना पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अप्पर तहसीलदार नीलेश गौंड यांनी दिली

जनता दरबारातही आवाज उठवला
उपजिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिल्यानंतरही पंचनामे होत नसल्याने याबाबत पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईसंदर्भात आवाज उठवला. मीना राऊत, कल्पना राऊत, गुलाब पाटील, साधना राऊत, वनिता राऊत, जयाबाई पाटील, निशा म्हात्रे, द्वारका पाटील, निशा म्हात्रे यांनी गाम्हाणे मांडत आपली कैफियत मांडली. मात्र त्यानंतरही पंचनामे होत नसल्याने आता आम्ही करायचे काय, असा सवाल या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे.