6 लीटर दूध, 2 किलो तूप, 13 किलो सुकामेवा अन् 30 किलो नमकीन तासाभरात फस्त; सरकारी अधिकाऱ्यांची ‘खाबुगिरी’ बिलातून उघड

सरकारी अधिकाऱ्यांची खाबुगिरी काही नवीन नाही. जनतेच्या पैशांच्या उधळपट्टीचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. आताही सरकारी अधिकाऱ्यांच्या खाबुगिरीचा असा एक प्रकार उघडकीस आला आहे.  तासाभराच्या कार्यक्रमासाठी एकत्र आलेल्या सरकारी बाबुंनी 6 लीटर दूध, 2 किलो तूप, 13 किलो सुका मेवा, 5 किलो साखर आणि 30 किलो नमकीन गट्टम केले. याचे बील समोर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

मध्य प्रदेशमधील शहडोल जिल्ह्यात गावोगावी जल संरक्षणाचे कार्यक्रम हाती घेण्यात आले होते. यासाठी सरकारी अधिकारी ठिकठिकाणी जाऊ जनजागृती करत होते. येथील भदवाही गावातही सरकारी अधिकारी पोहोचले होते. तिथे झालेल्या तासाभराच्या कार्यक्रमाचे बील आता समोर आले आहे. 19 हजार 10 रुपयांचे हे बील असून यात सरकारी अधिकाऱ्यांनी काय आणि किती खाल्ले याचा उल्लेख आहे. यातील आकडे बघून सर्वांचीच वाचा बसली आहे. हे अधिकारी आहेत का बकासूर? असा सवालही नेटकरी उपस्थित करत आहेत.

भदवाही गावात 25 मे 2025 रोजी जल संरक्षण अभियान अंतर्गत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायतचे सीईओ, एसडीएम आणि अनेक बडे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचा उद्देश गावातील ओढ्यावर बांध बांधून जमिनीत पाणी जिरवण्याचा होता. पण ते राहिले बाजुला अन् अधिकाऱ्यांनी काजू, बदाम, दूध, तूप, नमकीन यावर ताव मारला.

अधिकाऱ्यांसाठी 5 किलो काजू, 5 किलो बदाम, 3 किलो मनुके, 30 किलो नमकीन, 6 लीटर दूध, 5 किलो साखर आणि बिक्सिटांचे 20 पुडे फस्त केले. याचे 19,010 रुपये बील झाले, तर अधिकाऱ्यांनी 5,260 रुपयांची देशी तूपही प्यायले. सोशल मीडियावर याचे बील व्हायरल झाले अन् एकच गोंधळ उडाला.

याबाबत जिल्हा पंचायतचे प्रभारी सीईओ मुद्रिका सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अधिकाऱ्यांच्या चहा-नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती. पण एवढे महागडा सुका मेवा मागवल्याचे मला पहिल्यांदाच कळतेय. याची चौकशी केली जाईल असेही ते म्हणाले. ‘हिंन्दुस्तान‘ या वेबसाईटने याबाबत वृत्त दिले आहे.