सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा – नाना पटोले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठवाड्यासह राज्यातील इतर भागांत झालेल्या अतिवृष्टीने व पुराने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या संकटातून बळीराजाला उभे करण्यासाठी राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि केंद्र सरकारकडून भरीव मदत मिळवण्यासाठी राज्यातील भाजप नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी केले.

मे महिन्यात कोकण किनारपट्टीसह गुजरातलाही ‘तौकते’ चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त गुजरातचा हवाई पाहणी दौरा केला आणि गुजरातला एक हजार कोटी रुपयांची मदतही जाहीर केली. महाराष्ट्रातही ‘तौकते’ चक्रीवादळाने मोठे नुकसान केले असताना देशाच्या पंतप्रधानांनी त्याची दखलही घेतली नाही. महाराष्ट्राशी केंद्र सरकारने दुजाभाव केला. त्यानंतरही राज्याने केंद्राकडे मदत मागितली, परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेच पुसली, पोटोले म्हणाले.