प्रियंका गांधी वाड्रा यांच्या मुलांचे अकाउंट हॅक, सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

priyanka-gandhi-vadra-child

काँग्रेस सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी वाड्रा यांच्या मुलांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक केल्याच्या आरोपाची सरकारने गांभीर्याने दखल घेतली असून त्याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मंगळवारी (21 डिसेंबर) प्रियंका गांधी वाड्रा यांनी सरकारवर त्यांच्या मुलांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक केल्याचा आरोप केला होता.

त्यांचे वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर सरकारने त्याची स्वत:हून दखल घेत या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय (MEITY) ची इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT IN) याची चौकशी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

काँग्रेस सरचिटणीस यांनी काल लखनऊमध्ये सरकारवर त्यांच्या मुलांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक केल्याचा गंभीर आरोप केला होता. राजकीय विरोधकांच्या घरांवर आयकर विभागाचे छापे आणि बेकायदेशीर फोन टॅपिंगबाबत प्रश्न विचारला असता काँग्रेस सरचिटणीसांनी हे आरोप केले.

प्रियांका म्हणाल्या की, सरकार सोशल मीडियावर तिच्या मुलांना टार्गेट करत आहे. त्या म्हणाल्या की, “माझ्या मुलांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक होत आहेत. फोन टॅपिंग पुरेसे नाही. त्यांना काम नाही का?” प्रियंका गांधी यांना दोन मुले आहेत, 18 वर्षांची मुलगी मिराया वाड्रा आणि 20 वर्षांचा मुलगा रेहान वाड्रा. ही दोन्ही मुले सार्वजनिक जीवनात फारसे समोर येत नाहीत.