श्रीगोविंदमहाराज उपळेकर

212

> विवेक दिगंबर वैद्य

ज्यांच्या जयंतीस आज तिथीने 132 वर्षे पूर्ण झाली, त्या श्रीगोविंदमहाराज उपळेकर यांच्या अवतारकार्याचा हा पूर्वपरिचय.

उमदे व्यक्तिमत्त्व, उत्तम आचारविचार, प्रतिष्ठत डॉक्टरी पेशा व लष्करातील नोकरी असे सर्वकाही यथायोग्य लाभलेला गृहस्थाश्रमी तरुण एकाएकी विरक्तीच्या दिशेने वाटचाल करीत परमार्थ मार्ग आपलासा करतो आणि ‘संत’पदाला पोहोचतो हे तसे पाहिले तर नवलंच आणि हे ‘नवल’ ज्यांच्याविषयी घडले त्या डॉ. गोविंद रामचंद्र उपळेकर या सत्पुरुषाची लौकिक जगातील पूर्वओळख पुढीलप्रमाणे आहे.

पुढे श्रीगोविंदमहाराज किंवा गोविंदकाका नावाने सर्वत्र सुपरिचित झालेल्या उपळेकर महाराजांचे मूळ घराणे सोलापूर जिह्यात बार्शी नजीकच्या उपळाई खुर्द येथील होते. गोविंदकाकांच्या पूर्वजांपैकी धोंडोपंत व कुंडोपंत आणि त्यानंतरच्या पिढीतील नारायणराव ही सर्वच मंडळी संतवृत्तीची होती. काकांचे चुलते आणि ‘मलवडी’ संस्थानचे कारभारी अप्पाजीपंत कुलकर्णी यांच्या प्रारब्धात संतानयोग नसल्याने त्यांचा वारसा गोविंदकाकांचे वडील रामचंद्र नारायण उपळेकर यांच्याकडे आला. त्या काळी उपळेकरांच्या सुखवस्तू घराण्याकडे फलटणनजीक गिरवी, कांबळेश्वर, गुणवरे आदी गावांतील स्थावर मालमत्ता होती. मात्र घरातील काही मंडळींची अव्यावसायिक वृत्ती व त्या सोबतीने तत्कालिन जागतिक मंदी यांचे निमित्त होऊन यातील बरीचशी मालमत्ता कर्जात गेली. अशातच 1920 साली रामचंद्ररावांचे निधन झाले.

गोविंदकाकांचे बालपणीचे मराठी तिसरीपर्यंतचे शिक्षण फलटण येथील अँग्लो व्हर्नाकुलर येथे झाले. बालवयापासूनच त्यांना कुस्ती व मल्लखांब यांचे आकर्षण होते. अभ्यासात प्रावीण्य प्राप्त करणारे गोविंदकाका शाळेत जसे नावलौकिक राखून होते तसेच ‘सतार’वादनातही कौशल्य बाळगून होते. गोविंदकाकांचे संस्कृत आणि इंग्रजी भाषेवर अपार प्रभुत्व होते. प्रख्यात नाटककार विल्यम शेक्सपिअरची नाटके त्यांना मुखोद्गत होती. दरमहा आठ आणे शिष्यवृत्तीवर शिकणाऱया गोविंदकाकांनी पुढे पुणे येथील बी. जे. मेडिकल स्कूलमध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले व तेथून पुढे लष्करी शिक्षण घेण्याकरिता डेहराडून येथे गेले. विद्यालयात हुशार आणि व्यासंगी विद्यार्थी म्हणून सर्वांच्या प्रशंसेस पात्र ठरलेल्या गोविंदकाकांचे व्यक्तिमत्त्व अतिशय प्रभावी आणि प्रथमदर्शनीच छाप पाडणारे होते. गोविंदकाकांनी पुढे शिक्षणासोबत अर्थार्जनासही प्रारंभ केला. अंगभूत कौशल्याच्या जोरावर ते लष्करात, सेकंड लेफ्टनंटच्या हुद्दय़ावर सबअसिस्टंट सर्जनपदी रुजू झाले. आर्थिकदृष्टय़ा स्थिरस्थावर होईतोवर काकांची प्रापंचिक घडीही उत्तमरीत्या बसली. पत्नी आणि आठ लेकरांसहितच्या निगुतीने चाललेल्या सुखी संसारामध्ये त्यांच्यासाठी परमार्थाचे स्थान मात्र सर्वसामान्यपणे जितके असावयास हवे तितकेच होते.

गोविंदकाकांच्या बालपणी त्यांना काही वर्षे फलटण येथे वास्तव्यास आलेल्या हरिबाबा या विदेही सत्पुरुषाला पाहता आले. हरिबाबा हे लोकविलक्षण व्यक्तिमत्त्व होते. भजन, कीर्तन आणि पुराणश्रवणात रंगून जाणाऱया हरिबाबांचा ‘जय विठ्ठल जय जय विठ्ठल’ हा प्रिय जयघोष होता. फलटणचे अध्यात्मविश्व समृद्ध करणारा हा अवलिया 1898 सालच्या रथसप्तमीनंतर काही दिवसांतच देह विसर्जित करता झाला तेव्हा पंचक्रोशीवर शोककळा पसरली. गोविंदकाका तेव्हा दहा वर्षांचे होते. साधू म्हणजे काय, सत्पुरुष कुणाला म्हणावे याची समजही त्या बालवयाला नसली तरी हरिबाबांनी त्या काळात केलेले गारुड गोविंदकाकांच्या मनावर अखेरपर्यंत कायम राहिले. नोकरीनिमित्त बाहेरगावी असतानाही सुट्टीत फलटण येथे आल्यावर हरिबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्याचा गोविंदकाकांचा परिपाठ कधीही चुकला नाही. एकदा लष्कराच्या सेवेत असताना गोविंदकाका रजा घेऊन फलटणास आले आणि स्नेही डॉ. रावसाहेब रानडे यांच्या आग्रहावरून पुसेसावळी गावातील श्रीकृष्णदेव या सिद्धयोग्याच्या दर्शनास गेले. ही घटना वरकरणी जरी सहजसाधी होती तरीही डॉ. गोविंद उपळेकर या सुशिक्षित गृहस्थाश्रमी तरुणाचे रूपांतर ‘श्रीगोविंदमहाराज उपळेकर’ या ‘संत’तत्त्वामध्ये करण्यास कारणीभूत ठरली.

ही घटना घडण्याआधी 1914 साली पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान आफ्रिकेतील नैरोबी येथे ‘सर्जन’ म्हणून कार्यरत असताना दररोज जखमी सैनिकांवरील उपचार अन् शस्त्रक्रिया करण्याच्या प्रसंगांना वारंवार सामोरे जावे लागल्याने गोविंदकाकांची मनोवृत्ती बदलत गेली, विचित्र प्रकारची उदासीनता मनांत दाटून येत असे. गोविंदकाकांचे मन विरक्तीकडे ओढ घेत होते, याच काळात स्वप्नदृष्टांतामध्ये त्यांना एका दिगंबर विभूतीचे दर्शन वारंवार घडू लागले. महायुद्ध संपल्यावर हिंदुस्थानात परतलेल्या गोविंदकाकांची नियुक्ती पुढे रावळपिंडी येथे झाली. तिथेही हाच स्वप्नदृष्टांत पुनः पुन्हा होऊ लागल्याने गोविंदकाका विचारात पडले आणि रजा घेऊन फलटण येथे परतले. फलटण येथे मुक्कामास असतेवेळी गोविंदकाकांना त्यांचे स्नेही डॉ. रानडे यांनी पुसेसावळी येथे श्रीकृष्णदेव यांच्या दर्शनाला येण्याचा आग्रह केला. डॉ. रानडेंसोबत गोविंदकाका पुसेसावळी येथे गेले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांच्या स्वप्नात येणारी दिगंबरमूर्ती ‘श्रीकृष्णदेव’ यांच्या रूपात समोर बसलेली होती. श्रीकृष्णदेवांनी प्रथम भेटीतच गोविंदकाकांना स्वीकारले अन् काका श्रीकृष्णदेवांकडे कायमचे खेचले गेले.

गोविंदकाका पुसेसावळी येथे आले तेव्हा श्रीकृष्णदेव मूळव्याधीने बेजार झाले होते. चिघळून नासलेल्या जखमेला कीड लागली होती आणि त्यास विलक्षण दुर्गंधीही येत होती. श्रीकृष्णदेवांना व्याधिग्रस्त अवस्थेत पाहून गोविंदकाकांना राहवले नाही. उपचार करण्याकरिता ते पुढे सरसावले तेव्हा श्रीकृष्णदेवांनी प्रतिकार केला. अर्वाच्य शिव्या देत काकांची परिक्षा पाहिली. मात्र काकांनी हा सर्व त्रास शांतपणे सहन केला. श्रीकृष्णदेवांच्या जखमा स्वच्छ करून योग्य औषधोपचार केले आणि सेवा करून देवांचे मन जिंकले.

गुरु-शिष्याचे हे निर्व्याज प्रेम हळूहळू अशा पराकोटीला पोहोचले की, गोविंदकाकांना जळी-स्थळी-काष्ठाr-पाषाणी श्रीकृष्णदेव दिसू लागले. एकदा श्रीगुरूंच्या दर्शनासाठी कासावीस झालेले काका 42 मैल अंतर पायी चालून पुसेसावळीस गेले ते पुन्हा माघारी परतलेच नाहीत. घरातील मंडळी हवालदिल होऊन काकांच्या शोधार्थ पुसेसावळीस पोहोचली. त्यांनी काकांना बरेच समजावले, परंतु काही उपयोग झाला नाही म्हणून गोविंदकाकांचे हातपाय बांधून त्यांना फलटणला नेण्याची तयारी सुरू केली. आपल्या प्रिय शिष्याचे हाल गुरुमाऊलीस पाहावले नाहीत. श्रीकृष्णदेवांनी ‘गोइंदा, लवकर परत ये’ असा हृदय पिळवटून टाकणारा टाहो फोडला. फलटण येथे आणल्यावर काकांची समजूत काढली गेली, धाकदपटशा दाखविण्यात आला. मात्र काकांना लागलेले हे ‘गुरुभक्तीचे पिसे’ टळणे निव्वळ अशक्य होते.

(पूर्वार्ध)

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या