धुळीतल्या फायलींवर सरकारी फुंकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ अशी म्हण आहे. कारण सरकारी कार्यालयांत अनेक महिने फायली टेबलांवरच धूळ खात पडून असतात. त्यामुळे सर्वसामान्यांची कामे अडतात आणि कार्यालयांमध्येही अस्वच्छता निर्माण होते. त्यामुळे मंत्रालय व राज्य सरकारच्या कार्यालयांमधील पडून असलेल्या फायलींवर त्वरित निर्णय घेऊन सरकारी कार्यालये स्वच्छ करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने आज दिले आहेत.

मंत्रालय व सरकारी कार्यालयांमध्ये अनेक फायली वर्षानुवर्षे पडून असतात. फायलींचे वेळेवर वर्गीकरण होत नाही, काम झाल्यानंतरही अनेक फायली नष्ट केल्या जात नाहीत. कार्यालयांमध्ये कोपऱयात किंवा टेबलांवर अथवा कपाटांवर वर्षानुवर्षे फायली पडून असतात. त्यामुळे सरकारी कार्यालयांमधील अस्वच्छतेत अधिकच भर पडते. वाढत्या अस्वच्छतेबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर नाराजी व्यक्त केली होती.

सरकारी कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीतही निर्णय घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने मंत्रालय व सरकारी कार्यालयात स्वच्छता मोहीम राबविण्याचे व जुन्या फायलींचा निपटारा करण्याचे आदेश जारी केले आहेत.

summary- govt to clean its offices and files