जळकोट – घोषणा होऊनही ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कार्यवाही नाही

520

मागासवर्गीयांसाठी आरक्षित असलेल्या प्रभागात निवडून आलेल्या जळकोट तालुक्यातील 113 ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांनी विहित कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही म्हणून जिल्हाधिकारी यांनी 23 जानेवारी 2019च्या आदेशाने अशा सदस्यांना अपात्र ठरवलेले होते. परंतु त्यांचे पद रिक्त झाल्याचे घोषीत करूनही त्याची अंमलबजावणीच झालेली नाही. त्यामुळे हे आदेश अर्थशून्य ठरले असल्याचे म्हटले जात आहे.

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीमध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षित असलेल्या प्रभागातून निवडून आल्यानंतर जळकोट तालुक्यातील 113 व उदगीर तालुक्यातील 297 ग्रामपंचायत सदस्यांनी विहित कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी एका आदेशान्वये त्यांना अपात्र ठरवलेले होते.

जळकोट तालुक्यातील 113 सदस्यांमध्ये घोणसी 5, चिंचोली 2, कोळनूर 1, एकुर्का खुर्द 3, बोरगाव खुर्द 2, शेलदरा 5, तिरुका 4, पाटोदा खुर्द 2, अतनूर 2, गव्हाण 2, सुल्लाळी 3, धामणगाव 1, येलदरा 2, लाळी बु. 4, कुणकी 3, विराळ 2, हळद वाढवणा 3, डोंगरगाव 2, कोनाळी डोंगर 2, वांजरवाडा 6, सोनवळा 1, रावणकोळा 3, बेळसांगवी 4, शिवाजीनगर तांडा 1 , मेवापूर 5 या ग्रामपंचायतीच्या निवडणूका 2015 मध्ये झालेल्या होत्या. 2017 मध्ये निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतीमधील उमरगा रेतू 1, जगळपूर बु. 1, लाळी खुर्द 2, येवरी 2, करंजी 2, हावरगा, डोमगाव जिरगा 2, पाटोदा खुर्द 2, गुत्ती 4, होकर्णा 5, केकतसिंदगी 4, उमरदरा 2, मंगरुळ 2, ढोरसांगवी 4 अशा एकूण 113 सदस्यांचा समावेश होता.

या सदस्यांना अपात्र घोषीत करण्यात आलेले असले तरी प्रत्यक्षात हे सदस्य आजही कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारही करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनीही या संदर्भातील खुलासा सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकारी यांना दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या