बीड जिल्ह्यामध्ये भाजपचा बुरूज ढासळला; शिवसेनेची मुसंडी, राष्ट्रवादीचीही घोडदौड

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या बीड जिल्ह्यात भाजपचा बुरूज ढासळला गेला आहे. या निवडणुकीत शिवसेनेने मोठी मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादीचीही घोडदौड कायम आहे. बीडमध्ये शिवसेनेला अभूतपूर्व यश मिळाले आहे. तर परळीमध्ये धनंजय मुंडेंनी आपली ताकद दाखवून दिली आहे.

बीड जिल्ह्यातील 129 ग्रामपंचायतींपैकी 18 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली होती. 111 ग्रामपंचायतसाठी प्रत्यक्ष मतदान झाले. निवडणुकीत एकूण 83.58 टक्के मतदान झाले. एक लाख 33 हजार मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला होता. जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या. सोमवारी जाहीर झालेल्या निकालातून चित्र स्पष्ट झाले आहे.

बीड जिल्हा हा भाजपच्या बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला. शिवसेनेने मोठी मुसंडी मारली. तर राष्ट्रवादीने आपले बुरूज अबाधित ठेवले. बीड विधानसभा मतदारसंघात जयदत्त क्षीरसागरांच्या नेतृत्वाखाली जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या सहकार्यातून 35 पैकी 25 ग्रामपंचायत शिवसेनेने पटकावल्या. 7 ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या, तर एका ग्रामपंचायतीमध्ये संमिश्र पॅनलला कौल दिला गेला.

परळीत धनंजय मुंडेंनी आपली ताकद दाखवून देत भाजपाचा धुव्वा उडवला. 12 पैकी 10 ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्या. एका ग्रामपंचायतीवर भाजपाला समाधान मानावे लागले. तर एका ग्रामपंचायतीवर संमिश्र कौल दिसून आला. अशीच निवडणूक गेवराईत झाली. गेवराईत 22 पैकी 13 ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या. 4 ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकला तर भाजपाच्या ताब्यात 5 ग्राम पंचायती गेल्या.

शिरूर तालुक्यात 6 ग्रामपंचायतीपैकी 4 ग्रामपंचायतवर शिवसेनेचा भगवा फडकला. तर दोन ठिकाणी राष्ट्रवादीला यश मिळाले. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष बीड आणि परळीकडे लागले होते. या दोन्ही ठिकाणी भाजपाची मोठी पिछेहाट झाली आहे.

शिवसेनेचा जल्लोष
निकालानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला. जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या जिल्हा कार्यालयासमोर शिवसैनिकांनी गुलालाची उधळण केली. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयात शेकडो शिवसैनिक एकवटले होते. गुलालाची उधळण करत शिवसेनेचा नारा दिला गेला. माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या कार्यालयासमोरही शिवसैनिकांनी जल्लोष केला. निवडून आलेल्या उमेदवारांचे कुंडलिक खांडे, जयदत्त क्षीरसागर आणि अनिल जगताप यांनी अभिनंदन केले.

आपली प्रतिक्रिया द्या