ग्रामसेवकांच्या कामबंद आंदोलनाने 43 ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प

ग्रामविकास विभागाकडून विविध प्रलंबित मागण्या मंजूर होत नसल्याने त्या मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जळकोट तालुक्यातील ग्रामसेवकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प झाले आहे. सदैव वर्दळ असणाऱ्या ग्रामपंचायतींना टाळे असल्याने या कचेरींमध्ये आता शुकशुकाट आहे.

2005 नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, प्रवास भत्ता मंजूर करावा, ग्रामसेवकांवरील कामांचा वाढता बोजा विचारात घेऊन नवीन ग्रामसेवकांची नियुक्ती करावी, 2011 च्या लोकसंख्येवर आधारित ग्रामविकास अधिकारी सज्जांची पुनर्रचना करावी, वेतनातील त्रुटी दूर करून सुधारित वेतन लागू करावे, अन्य विभागाकडील कामे लादू नयेत, एका गावासाठी एक ग्रामसेवक पॅटर्न लागू करावा या व अन्य मागण्या राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 9 ऑगस्ट रोजी जळकोटच्या पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तरीही मागण्यांची दखल घेतली गेली नाही, त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सज्जातील ग्रामपंचायतींच्या चाव्या व शिक्के गटविकास अधिकारी संजय गोस्वामी यांच्याकडे सुपूर्द करून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

संबंधित गावचे सरपंच व नागरिक यांच्या समक्ष अभिलेखे सीलबंद करण्यात आली आहेत. या आंदोलनामुळे तालुक्यातील 43 ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प झाले आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या नागरिकांचे काम ग्रामपंचायतीकडे असते. ग्रामसेवक हा ग्राम प्रशासनाचा कणा आहे. तोच कामावर नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे आंदोलन सुरू झाल्याने निवडणूक काळात प्रशासनाचीही कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंदोलनावर तोडगा काढावा अशी मागणी होत आहे. संघटनेचे तालुकाध्यक्ष एस.एस. सय्यद, सचिव एस.एम. पाटील, उपाध्यक्ष कबाडे, एन.एम. स्वामी, के.एल. सर्केलवाड, एफ.एफ. शेख, सी.जी. बिडवई, डी.बी. हैबतपुरे, व्ही.ए. भोसले, एस.एम. राजगिरवाड, के.व्ही. उडते, जी.एस. व्हरकटे, आर.जी. मोहम्मद, एम.जी. जाधव, बी.जे. माकुरवार, एम.एन. जानतिने, एस.झेड. म्हेत्रे, व्ही.ए. दाडगे आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या