कोकणातील सुप्रसिद्ध ‘म्हानाड’ सरता खेळ, भुईबावडा येथील शिमगोत्सवाची आज सांगता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सह्याद्रीच्या कुशीत आणि ऐतिहासिक किल्ले गगनगडाच्या पायथ्याशी वसलेल्या भुईबावडा गावातील प्रसिद्ध शिमगोत्सवाची आज, बुधवारी मोठ्या उत्साहात सांगता होत आहे. पांडवकालीन पर्यटन स्थळे आणि धार्मिक वारसा लाभलेल्या या गावात पंधरा दिवस चालणाऱ्या या उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेला पारंपरिक ‘म्हानाड’ म्हणजेच ‘सरता खेळ’ पाहण्यासाठी कोकणासह मुंबई, पुणे आणि कोल्हापूरमधील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

भुईबावडा येथील श्री देव रवळनाथ देवालयाचा हा उत्सव कोकणात अत्यंत मानाचा समजला जातो. होळीपासून सुरू होणाऱ्या या १५ दिवसांच्या उत्सवादरम्यान विविध धार्मिक विधी पार पाडले जातात. विशेषतः कोकण परिसरातील माहेरवाशिणी या काळात आपल्या लाडक्या देवाची ओटी भरण्यासाठी आणि पालखी सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात. ‘म्हानाड’ या आगळ्यावेगळ्या खेळाची परंपरा आजही गावकऱ्यांनी तितक्याच श्रद्धेने आणि दिमाखात जपली आहे.

आज बुधवार, १८ मार्च रोजी सकाळी विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. रात्री ढोल-ताशांच्या गजरात, अबीर-गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या भव्य आतषबाजीत ग्रामदैवताची पालखी नाचविली जाणार आहे. उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे पहाटेच्या वेळी काढली जाणारी विविध देव-देवतांची सोंगे. यामध्ये राम-लक्ष्मण आणि ताटिका राक्षसीणीची सोंगे सादर केली जातात, ज्याने या उत्सवाची सांगता होते.

या सोहळ्यासाठी मुंबईस्थित चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल झाले असून गावामध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पारंपरिक उत्सवाचा आणि ‘सरता खेळ’ या वैशिष्ट्यपूर्ण यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भुईबावडा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.