ग्रॅण्टरोड, चर्नीरोड, मरीन लाइन्स स्थानकांना मिळणार हेरिटेज लूक

445

पश्चिम रेल्वेच्या ग्रँटरोड, चर्नीरोड आणि मरीन लाइन्स या रेल्वे स्थानकांना पुन्हा त्यांचे गतवैभव मिळणार आहे. मुंबईतील या शतकाहून जुन्या स्थानकांचा कायापालट करण्यात येणार असून त्यांना हेरिटेज लूक देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पुन्हा जुना काळ अनुभवता येणार असून या स्थानकांचा इतिहास जपला जाणार आहे.

पश्चिम रेल्वेवरील ग्रँट रोड, चर्नी रोड आणि मरीन लाइन्स या स्थानकांना अनोखा इतिहास असून त्याची जपणूक करण्यासाठी त्यांना हेरिटेज लूक देण्यात येणार आहे. आगामी तीन वर्षांत या स्थानकांना त्यांचे गतवैभव मिळवून देण्यात येणार आहे. या कायापालटासाठी ग्रँट रोड स्थानकासाठी 5.31 कोटी रुपये, चर्नी रोड स्थानकासाठी 3.74 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात या दोन स्थानकांचे काम होणार आहे तर मरीन लाइन्स स्थानकाचे काम दुसऱया टप्प्यात होणार आहे.

1859 मध्ये ग्रँट रोड स्थानक सुरुवातीला टर्मिनस म्हणून बांधण्यात आले. कालांतराने हे टर्मिनस मुंबई सेंट्रल येथे हलवण्यात आले. सध्या ग्रँट रोड स्थानकात चार प्लॅटफॉर्म असून तीन पादचारी पूल आहेत. या स्थानकातून दररोज 77 हजार 345 प्रवासी प्रवास करतात. स्थानकातील इमारतीची दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली. या स्थानकाला हेरिटेज लूक देण्यात येणार असून स्थानकातील आसनांची व्यवस्था, चहा स्टॉलदेखील जुन्या काळातील वाटावे असेच डिझाईन करण्यात येणार आहेत.

चर्नी रोडच्या तिकीट घराची जागा बदलणार
चर्नी रोड स्थानक 1867 मध्ये सुरू करण्यात आले होते. या स्थानकात चार प्लॅटफॉर्म असून दररोज जवळपास 51 हजार 855 प्रवासी दररोज प्रवास करतात. स्थानकालाही नवीन लूक देताना काही अंतर्गत बदल करण्यात येणार आहेत. तिकीट घराची जागा देखील बदलण्यात येणार आहे. या नूतनीकरणाच्या कामाअंतर्गत या स्थानकांना हेरिटेज लूक देण्यात येणार आहे. स्थानकाच्या नूतनीकरण कामासाठी निविदा काढण्यात येणार असून सर्व काही सुरळीत झाले तर येत्या दोन वर्षात हे काम पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या