इथे शेती नाही, पाणी पिकतं; नदी नांगरणीचा अभिनव प्रयोग

plowing-in-river-land

अभिषेक भटपल्लीवार । चंद्रपूर

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नदीची नांगरणी करण्याचा अभिनव प्रयोग चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर इथं करण्यात आला आहे. ऐकायला जरा विचित्र वाटत असलं, तरी नदीपात्रात पावसाचं पाणी मुरण्यासाठी ही पद्धत उपयुक्त असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळं चिमूरसारख्या ग्रामीण भागात किती प्रगत विचार केला गेला, हे दिसून आलं.

चिमूर हे तालुक्याचं ठिकाण असून, इथं दोन वर्षांपूर्वी नगरपालिका अस्तित्वात आली. या शहराला जवळच्या उमा नदी पात्रातून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी पात्रात विहिर आहे. मात्र, गेल्या चार-पाच वर्षांपासून या नदीचं पात्र उथळ झालं. शिवाय शेतातील मातीचा गाळ पृष्ठभागावर साचल्यानं तो कठोर झाला. परिणामी नदीतील पाण्याचा निचरा पात्रात व्हायला हवा, तो होत नव्हता. त्यामुळे पालिकेच्या विहिरीला कोरड पडली. पावसाचं पाणी या कठोर पृष्ठभागावर वाहून जावू लागल्यानं पाणी पात्रात मुरण्याचं प्रमाण जवळपास नष्ट झालं होतं. यावर चिमूर पालिकेनं नामी शक्कल लढवली. नदीतील बंधाऱ्याजवळच्या पात्रात चक्क नांगर फिरवलं. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळील सुमारे 800 मीटरचं पात्र नांगरून काढलं. ही भन्नाट शक्कल कुणी शोधून काढली, हे गुलदस्त्यात असलं, तरी यातून जमिनीत पाणी मुरण्यास निश्चित फायदा होईल, असं अभ्यासकांचं मत आहे.

चिमूर शहरात सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळ पाणीपुरवठा यंत्रणेवरील ताण वाढला आहे. त्यात भारनियमानाची भर पडली. पाणीपुरवठा करणाऱ्या स्त्रोतांची पातळी खालावली. शहराला कायमस्वरूपी पाणी पुरवठ्यासाठी उमा नदीवर बंधारा बांधण्यात आला. परंतु त्यानंतर नदीचं खोलीकरण केलं गेलं नाही. परिणामी नदीचं पात्र उथळ झालं. पात्रात आता नावालासुद्धा वाळू दिसत नाही. ही स्थिती बघता पात्राच्या खोलीकरणाची परवानगी उपविभागीय अधिकाऱ्यांना मागितली गेली. मात्र परवानगीची प्रक्रिया किचकट असल्यानं नांगर फिरवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. चिमूर हा तसा ग्रामीण भाग. मात्र, अशा परिसरातील पालिकेनं अशाप्रकारचा वेगळा विचार करून पाणीप्रश्न सोडवण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद म्हटला पाहिजे. पावसाळा सुरू झाल्यावर या प्रयोगाचे अनुकूल परिणाम दिसून येतील, अशी आशा अभ्यासकांनी व्यक्त केलीय.