हेडफोनने घेतला जीव, शेतात काम करताना अचानक वीज कडाडली आणि …

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोबाईलवरील गाणी ऐकण्यासाठी वापरली जाणारी हेडफोन कोणाचा जीव घेऊ शकतात का? असा सवाल हेडिंग वाचून तुमच्या मनात आला असेल. मात्र हे खरे आहे. ग्रेटर नोएडा भागात राहणाऱ्या एका तरुणाचा हेडफोनने जीव घेतला आहे. शेतात काम करताना अचानक विजांचा कडकडात झाला आणि कानातील हेडफोनचाही ब्लास्ट झाला, यातच एका तरुणाचा मृत्यू झाला.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, ग्रेटन नोएडातील जेवर येथे राहणाऱ्या गौतम नावाच्या तरुणाचा वीज पडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे वीज कोसळली तेव्हा गौतम हेडफोनवर गाणी ऐकत होता. वीज कोसळताच कानातील हेडफोनचा स्फोट झाला आणि यातच त्याचा मृत्यू झाला.

रविवारी गौतम स्वत:च्या मालकीच्या शेतात गेला होता. काम करताना अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. पावसापासून वाचण्यासाठी तो शेतात बनवलेल्या झोपडीत शिरला आणि पलंगावर बसला. यावेळी तो हेडफोनवर गाणी ऐकत होता. याच दरम्यान विजांचा मोठा कडकडात झाला.

काही वेळाने त्याच्या शेताजवळून पायवाटेने जाणाऱ्या एका व्यक्तीने गौतम झोपडीत पलंगावर पडल्याचे आणि त्याच्या तोंड, कानातून रक्त येत असल्याचे पाहिले. वीज कोसळल्याने कानातील हेडफोनचा ब्लास्ट झाला आणि यातच त्याच्या मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

या प्रकरणी जेवर कोतवाली पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. गौतमचा नुकताच विवाह झाला होता. त्याच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.