नाशिक जिल्ह्यातील वृक्षतोडीला हरित लवादाची अंतरिम स्थगिती, कायदेशीर प्रक्रियेशिवाय एकही झाड तोडता येणार नाही

शहरातील तपोवनापाठोपाठ हरित लवादाने आता संपूर्ण नाशिक जिह्यातील बेकायदेशीर वृक्षतोडीस अंतरिम स्थगिती देऊन जिल्हा प्रशासनाला जोरदार धक्का दिला आहे. कायदेशीर प्रक्रियेशिवाय एकही झाड तोडता येणार नाही, असे अश्विनी भट यांच्या याचिकेवरील सुनावणी वेळी लवादाने म्हटल्याचे अॅड. श्रीराम पिंगळे यांनी सांगितले. वाडीवऱहे ते समृद्धी महामार्गावर दोनशे वर्षे जुन्या वडांची बेकायदेशीररित्या कत्तल सुरू झाल्याने भट यांनी ही याचिका दाखल केली होती.

  वाडीवऱहे ते समृद्धी महामार्गावर 19 डिसेंबर रोजी 200 वर्ष जुन्या वडाच्या झाडांची कत्तल सुरू होती. हे लक्षात येताच नाशिकच्या अश्विनी सुनील भट यांनी घटनास्थळी जावून वृक्षतोड रोखण्यासाठी प्रयत्न केला. तेथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना परवानगीविषयी विचारणा केली. तेव्हा त्या कर्मचाऱ्यांनी 19 ऑगस्ट रोजीचे एक पत्र दाखवले, त्यात अपघातग्रस्त वृक्ष व फांद्या तोडीबाबत फक्त 30 दिवसांची मुदतवाढ दिलेली होती. ते पत्र 18 सप्टेंबर रोजी कालबाह्य झाले होते. वृक्षतोड बेकायदेशीर ङ्खरत असल्याचे भट यांनी सांगताच कर्मचाऱ्यांनी पळ काढला. त्यानंतर त्यांनी तपोवनप्रश्नी हरित लवादात धाव घेणारे अॅड. श्रीराम पिंगळे यांच्याशी संपर्क साधून त्याच दिवशी माहिती दिली. पिंगळे यांनी लगेचच पुणे येथील हरित लवादाच्या पश्चिम विभागात सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिकचे विभागीय वन अधिकारी, राज्याचे मुख्य वन संरक्षक, महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरण चेअरमन आणि महाराष्ट्र शासन यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली.

या याचिकेवर आज हरित लवादाकडे सुनावणी झाली. नाशिक जिह्यामध्ये संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया राबवून वृक्षतोडीचा परवाना मिळाल्याशिवाय एकही झाड तोडू नये असे अंतरिम आदेश पारित केले आहेत. तसेच वस्तुस्थितीबद्दल शासनाच्या वरील विभागांना म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. भट यांच्या वतीने अॅड. पिंगळे यांनी युक्तिवाद केला, त्यांना सहकारी अॅड. विकास अगरवाल यांनी सहाय्य केले.

याआधी नोव्हेंबरपासून तपोवनातील वृक्षतोडीविरोधात जनआंदोलनाचा वणवा पेटला. श्रीराम पिंगळे यांनी हरित लवादाकडे याचिका दाखल केली, त्यावर 12 डिसेंबरला सुनावणी होवून तपोवनातील वृक्षतोडीला 15 जानेवारीपर्यंत अंतरिम स्थगिती देण्यात आली. त्यानंतर आता लवादाने पूर्ण जिह्यातील बेकायदेशीर वृक्षतोडीला अंतरिम स्थगिती दिली आहे.

पर्यावरणप्रेमींनी रोखली वृक्षतोड

वाडिवऱहे ते समृद्धी महामार्ग परिसरात 19 डिसेंबरनंतर पुन्हा एकदा 29 डिसेंबर रोजी वृक्षतोड सुरू झाली होती, हे भट व इतर पर्यावरणप्रेमींना कळाले. त्यानंतर तातडीने गौरव देशमुख, रोहन देशपांडे व पर्यावरणप्रेमींनी धाव घेत वृक्षतोडीचा डाव हाणून पाडला. या ठिकाणी डिसेंबरमध्ये साधारण 25 झाडांची कत्तल झाल्याची माहिती पिंगळे यांनी दिली.