जीएसटी अधिकाऱ्यांकडून करदात्यांची गोपनीय माहिती लीक, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागातील काही अधिकारी आणि कर्मचारी करदात्यांची गोपनीय माहिती लीक करत असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

अंबादास दानवे यांनी यासंदर्भात अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. जीएसटी नोंदणीसंदर्भातील माहिती बाहेर लीक होत आहे. जीएसटीसाठी अर्ज केलेल्या अनेक व्यावसायिकांना नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यावर विविध बँकांकडून सदर पंपनीच्या नावाने खाते उघडण्यासाठी पह्न येत आहेत. यावरून करदात्यांची माहिती लीक झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. कदाचित काही कर्मचाऱ्यांकडून ती माहिती विकली जात आहे असा संशयही दानवे यांनी व्यक्त केला आहे. या गंभीर प्रकारामुळे करदात्यांमध्ये शासनाबद्दल अविश्वासाची भावना निर्माण झाली असल्याचे दानवे यांनी पत्रात नमूद केले आहे.