
मागील काही महिन्यांपासून जालन्यात कधी जीएसटी तर कधी इन्कम टॅक्सचे धाडसत्र सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. या धाडसत्रामुळे जालन्यातील व्यापारी वर्गाने मात्र चांगलीच धास्ती घेतली आहे. 27 ऑक्टोबर गुरूवार रोजी दुपारी चार वाजता अचानक 25 ते 30 अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताफा जालना शहरातील जुना मोंढा परिसरात घुसला आणि त्यांनी 5 ते 6 दुकानात प्रवेश करून विचारपूस करत तपासणीला सुरुवात केली. इतक्या गाड्या व इतकी लोकं अचानक दुकानांत शिरल्याने इन्कम टॅक्सची धाड पडल्याची बातमी क्षणभरात वाऱ्यासारखी पसरली.
काही दुकानांचे शटर बंद झाल्याने नेमकी काय तपासणी चालू आहे हे कळायला मार्ग नसला तरी हे GST चे अधिकारी असल्याचे कळते आहे. दुपारी चार वाजल्यापासून आतापर्यंत या दुकानांची तपासणी सुरूच आहे. या वाऱ्यासारख्या पसरलेल्या बातमीने बाजारपेठेत एकच खळबळ उडाली आहे. शहरातील जुना मोंढ्यात 25 ते 30 अधिकारी दाखल झाले असून रमेश हरिराम होलसेल क्लॉथ सेंटर, बंजारा केंद्र, आकाश गारमेंट सह अजून 5 ते 6 दुकानांची तपासणी सुरू आहे.
शहरातील औद्योगिक वसाहत तसेच विविध व्यापाऱ्यांच्या निवासस्थानी मागील काही महिन्यांमध्ये कधी जीएसटी तर इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या मात्र या धाडींमध्ये नेमके काय हाती लागले हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे. आजच्या धाडसत्रामध्ये सुद्धा जीएसटी पथकाला काय हाती लागले हे मात्र माध्यमांसमोर आले नाही.




























































