पालकमंत्री बावनकुळे वादाच्या भोवऱ्यात! नागपूरमध्ये भाजपकडून आचारसंहितेचा भंग; काँग्रेसचा आरोप

नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची मुदत संपलेली असतानाही भाजपकडून नागपूरमध्ये आचारसंहितेचा भंग केला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे भाजप उमेदवारासह फिरताना आढळले. यामुळे बावनकुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजप उमेदवारासोबत फिरत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस उमेदवारांनी केला आहे. पालकमंत्री म्हणून त्यांना फिरण्याचे स्वातंत्र्य असले तरी प्रचारबंदी लागू झाल्यानंतर एखाद्या उमेदवारासोबत प्रत्यक्ष फिरणे हे निवडणूक आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन आहे, असा आक्षेप काँग्रेसने घेतला. यामुळे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांत शाब्दिक चकमक उडाली. यामुळे काही काळ कुतुबशहा नगर परिसरात तणाव निर्माण झाला होता.

काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने

पालकमंत्री बावनकुळे राजू देवगडे यांच्या घरी गेले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी याबाबत आक्षेप घेतला. या घटनेची माहिती मिळताच भाजप तसेच काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने आल्याने कुतुबशहा नगर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती समजून घेतली. गिट्टीखदान पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान राखत घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही गटांना शांत केले.