हिंदू नववर्षाचा मराठमोळा थाट! ढोल-ताशांचा दणदणाटात शोभायात्रांनी दुमदुमली शहरं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीमचे संचलन, पारंपरिक पोशाखात नटलेली तरुणाई… अशा थाटात आज ठिकठिकाणी भव्य शोभायात्रा निघाल्या. पारंपरिक पद्धतीने काढलेल्या या शोभायात्रांनी मुंबई शहर उपनगरासह ठाणे, डोंबिवली दुमदुमून गेले. सामाजिक संदेश देणारे चित्ररथदेखील शोभायात्रेचे आकर्षण ठरले. आबालवृद्धांनी एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊन आपला आनंद व्यक्त केला.

शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. 12 व शिवसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू नववर्ष स्वागत सोहळा मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याची सुरुवात गिरगाव नाका येथे गिरगावच्या महाराजा गणेशाचे व गुढी पूजन करून करण्यात आली. जगदंबा ढोल पथकाच्या गजरात कार्यक्रमाची मंगल सुरुवात झाली. या भव्य सोहळ्यात शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले शिवसेवा प्रतिष्ठानतर्फे साकारण्यात आलेली 18 फुटी अक्कलकोट स्वामी समर्थ यांची भव्य मूर्ती. तसेच 137 महिला व पुरुष बाईकस्वार पारंपरिक वेशभूषेत सजवलेल्या बाईक्ससह सहभागी झाले होते. शोभायात्रेत दांडपट्टा, वारकरी भजन, खंडोबाचा गोंधळ, मल्लखांब यांसारख्या पारंपरिक कला सादर करण्यात आल्या. महिलांच्या विविध पथकांनीही कार्यक्रमात रंगत आणली. कुलाबा ध्वज पथक, ठाकूरद्वार वारकरी नृत्य, कुंभारवाडा येथील महिलांनी ‘मराठी शाळा वाचवा’ या विषयावर प्रबोधन केले. मुंबादेवी महिलांचे स्वामी समर्थ भजन-नृत्य, मलबार हिल लेझीम पथक इत्यादी सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी अखिल मुगभाट गोविंदा पथकाने 7 थरांची सलामी दिली. मुंबादेवीचा महाराजा, उरणकर वाडी सार्वजनिक मंडळ, अखिल खोताची वाडी सार्वजनिक मंडळ यांनीही सहभाग घेतला. या सोहळ्यात शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, शिवसेना सचिव विनायक राऊत, उपनेते सचिन अहिर, अशोक धात्रक, रवींद्र मिर्लेकर, राजकुमार बाफना, अरुण दुधवडकर, नगरसेवक साईनाथ दुर्गे आदी मान्यवर सहभागी झाले होते. या भव्य सोहळ्याचे आयोजन विभागप्रमुख संतोष शिंदे व महिला विभाग संघटक युगंधरा साळेकर यांनी केले.

गुढीपाडव्यानिमित्त शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी बीडीडी येथील शिवसह्याद्री फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मराठी नववर्ष शोभायात्रेत सहभागी होऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच गिरगावातील देखील शोभायात्रेत सहभागी होत मराठी संस्कृतीचा, परंपरेचा आणि एकतेचा उत्सव साजरा केला.

गुढीपाडव्यानिमित्त शिवसेना उपनेते आणि रेल कामगार सेनेचे सरचिटणीस दिवाकर (बाबी) देव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी हिंदू नववर्षाचे प्रतीक म्हणून गुढी भेट देत त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी नरेश बुरघाटे, स्वप्नील झेमसे, प्रशांत कामनकर, संतोष मोहन देवळेकर, विकास पाटील, राजेश भगत उपस्थित होते.

ताडदेवमधील वैभव यात्रेत लोककलेचे दर्शन

विसर्जनाचा सोहळा, वारकऱयांची टाळ -मृदुंगावर साथसोबत, स्वराध्याच्या भव्य वादक पथकाची धुंद संगीताची जोड अशा अस्सल मराठमोळ्या वातावरणात ताडदेवकरांचा उत्साह टिपेला पोहोचला. निमित्त होते शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर यांच्या वतीने आयोजित जय भवानी प्रतिष्ठानच्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे. आधुनिक मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेट यांना वंदन करून त्यांनीच स्थापन केलेल्या नाना चौक येथील भवानी शंकर देवालयापासून यात्रेची सुरुवात झाली. साताऱयातील लेझीम पथक आणि चिपळूणमधून आलेल्या नमन पथकाने आपल्या कलेचे सादरीकरण केले. कोल्हापूरचा दांडपट्टा आणि सिंधुदुर्गातील कलाकारांनी रोंबाटसारखे पारंपरिक खेळ सादर करत उपस्थितांना अचंबित केले. शिवसेना नेते विनायक राऊत, आमदार सुनील शिंदे यांनीही यात्रेत उपस्थित राहत सर्वांना शुभेच्छा दिल्या.

वरळीत महिलांच्या हस्ते गुढीपूजन

पारंपरिक वाद्यांचा गजर, आकर्षक गुढय़ा, सांस्कृतिक देखावे, महिलांची बाईक रॅली तसेच कोळी नृत्य, तारपा नृत्य यांसारख्या लोककला सादरीकरणांनी वरळी परिसरात हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यात आले. शिवसह्याद्री फाऊंडेशन आणि आम्ही वरळीकर यांच्या संयुक्त विद्यमाने या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी जांबोरी मैदान, डॉ. जी. एम. भोसले मार्ग, वरळी येथून शोभायात्रेला सुरुवात झाली. महिलांच्या हस्ते गुढीपूजन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, प्रभाग समिती अध्यक्षा पद्मजा चेंबूरकर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, आमदार सुनील शिंदे, आमदार सचिन अहिर, नगरसेविका अबोली खाडये, माजी महापौर नंदू साटम उपस्थित होते.

मराठी शाळा वाचलीच पाहिजे

  ‘जल्लोष ढोल पथक’ने शाळेच्या गणवेषात ढोल वाजवत ‘आपली मराठी शाळा वाचली पाहिजे’ हा प्रभावी संदेश देणारे लोकनाटय़ सादर केले. ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जिवंत देखावा हे शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरले, अशी माहिती शिवसह्याद्री फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय शंकर कदम आणि सरचिटणीस महेश खवणेकर यांनी दिली.

आरसीएफ कर्मचाऱयांची उत्कर्षाची गुढी

आरसीएफ वसाहतीमध्ये हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आरसीएफ क्रीडा संकुल ते गंगाधर देशमुख सभागृह यादरम्यान भव्य शोभायात्रा काढण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आरसीएफच्या उत्कर्षाची गुढी उभारण्यात आली. यावेळी सुब्रमण्यम, तांत्रिकी संचालिका रितू गोस्वामी, विपणन संचालक सोनक, आरसीएफ कर्मचारी सेनेचे सरचिटणीस दत्तात्रय परब, समितीचे सरचिटणीस आल्हाद महाजन, एससी-एसटी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश निकाळजे, जे.पी. सिंग, सुनील पवार, युनिट सेक्रेटरी ट्रॉम्बे नीलेश गावकर उपस्थित होते.

जोगेश्वरीत ढोल-ताशांचा गजर

जोगेश्वरीकरांची हिंदू नववर्ष गुढीपाडवा स्वागत यात्रा मोठय़ा उत्साहात पार पडली. आमदार अनंत (बाळा) नर यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य शोभायात्रेचे आयोजन केले होते. पालखी, ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी मराठमोळय़ा पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. नववर्ष स्वागतयात्रेत शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, महिला विभाग संघटिका शालिनी सावंत, विधानसभा प्रमुख विश्वनाथ सावंत, नगरसेवक जितेंद्र वळवी, कैलासनाथ पाठक, नगरसेविका लोना रावत, शिवानी परब, मानसी जुवाटकर उपस्थित होते.

गोरेगावात साकारला शिवकालीन प्रसंग

गोरेगाव उन्नत नगर येथील अनमोल फॉरच्युन सोसायटीच्या रहिवाशांनी ‘जाणता राजा’ या महानाटय़ातील प्रसंग सादर केले. शिवजन्माचा देवदुर्लभ सोहळा साजरा करण्यात आला. त्यानंतर शिवचित्रातील अफजलखान वधाचा प्रसंग सादर करण्यात आला. त्यानंतर सुभेदार तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला स्वराज्यात आणण्याचा विडा उचलला तो प्रसंग सादर करण्यात आला व नंतर बाजीप्रभू देशपांडे यांचा चित्तथरारक पावनखिंड प्रसंग अवतरित झाला आणि मग शिवराज्याभिषेक सोहळय़ाने कार्यक्रमाची सांगता झाली. शिवभक्त राजू देसाई यांनी प्रत्येक प्रसंगाचे निवेदन केले.