पंढरपुरात चैत्र गुढीपाडव्याचा उत्साह, विठुरायाचा गाभारा आकर्षक फुलांनी सजला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी आज पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि गाभारा विविध रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक सजावटीने न्हाऊन निघाला आहे. या नयनरम्य पुष्पविलेपनामुळे देवाचे सावळे रूप अधिकच तेजस्वी आणि प्रसन्न दिसत असून संपूर्ण मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

मंदिर व्यवस्थापक संदेश भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विशेष सजावटीसाठी मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी फुलांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने 250 बंडल पिंक डेझी, 800 काडी पांढरी शेवंती, 50 बंडल गुलाब, 300 बंडल कामिनी आणि 20 बंडल जिप्सो फुलांचा समावेश आहे. तसेच 30 बंडल जनाडो पत्ता, 10 बंडल आर्किड, 70 किलो झेंडू, 20 किलो शेवंती, 20 किलो अस्टर आणि 20 नग अशोक पाल्याच्या माळा वापरून हा नयनरम्य देखावा साकारण्यात आला आहे. ही भव्य पुष्पसेवा रांजणगाव महागणपती येथील विठ्ठल भक्त नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांनी सेवाभावी वृत्तीने विनामूल्य अर्पण केली आहे. पुण्यातील ‘श्री कुमार शिंदे व श्री फ्लॉवर्स’ या डेकोरेटर्सनी सुमारे 12 कामगारांच्या मदतीने रात्रभर परिश्रम घेऊन ही आकर्षक आरास पूर्ण केली. दरवर्षी महत्त्वाच्या सण आणि उत्सवांच्या निमित्ताने मंदिरात अशा प्रकारे विशेष सजावट करण्याची परंपरा आहे.

मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन वर्षाची सुरुवात करण्यासाठी हजारो भाविकांनी पंढरपुरात गर्दी केली आहे. पहाटेपासूनच विठ्ठलाच्या नामगजराने आणि टाळ-मृदंगाच्या आवाजाने चंद्रभागेचा तीर आणि मंदिर परिसर दुमदुमून गेला आहे.