
गुजरातच्या सुरत शहरानजीकच्या कोसांबा येथे सोमवारी मध्यरात्री चालकाचे नियंत्रण सुटलेल्या बेफाम डंपरने फुटपाथवर झोपलेल्या 20 बांधकाम मजुरांना चिरडले. उसाच्या ट्रक्टरला आदळून हा ट्रक फुटपाथवर चढला आणि घटनास्थळी गाढ निद्रेत असलेल्या 15 मजुरांचा या ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. दुर्घटनेत सापडलेले मजूर राजस्थानच्या बांसवाडा जिह्याचे रहिवासी आहेत. मृतांत एकाच कुटुंबातील 5 जणांसह एका बालिकेचा समावेश आहे. हा अपघात एवढा भीषण होता की 12 जणांनी जागेवरच प्राण सोडले, अन्य 3 जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य 5 जखमींवर उपचार सुरू आहेत. या भीषण अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त करीत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजर रुपयांची तत्काळ आर्थिक मदत जाहीर केली आहे.
सुरतच्या किम -मांडवी रोडवर पालोडगाम भागात दिवसभर काम करून दमलेले मजूर सहकुटुंब फुटपाथवर झोपले होते. आपल्यावर काळाचा घाला घालणारी घटना घडेल याची कल्पनाही त्यांना नव्हती. सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास रस्त्यावरून जाणाऱया डंपर ट्रकची उसाने भरलेल्या एका ट्रक्टरशी जोरदार धडक झाली. या धडकेने डंपर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून तो थेट फुटपाथवर चढला. या ट्रकने फुटपाथवर गाढ निद्रेत असलेल्या 20 मजुरांना चिरडले. काय घडतेय ते कळण्याआधीच 12 मजुरांनी झोपेतच प्राण सोडले, तर अनेक जण जखमी झाले. घटनास्थळी रक्त माणसाचा ठार पडलेला दिसत होता. स्थानिक नागरिकांनी किंवाळ्या आणि कोलाहल ऐकून मध्यरात्री घटनास्थळी धाव घेत जखमींना रिक्षा अथवा मिळेल त्या वाहनांनी रुग्णालयात पोचवले. त्यामुळे अनेक जखमींना दिलासा मिळाला. अपघातात एका 6 महिन्यांची बालिका आश्चर्यकारकरीत्या बचावली. तिचे आईवडील मात्र दुर्घटनेत ठार झाले आहेत. या मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले आणि त्यांनी या बालिकेला उपचारासाठी रुग्णालयात नेल्याने ती वाचली.
दुर्घटनेतील 10 मृतांची ओळख पटली
पालोडगाम ट्रक दुर्घटनेतील 15 मृतांपैकी 10 जणांची ओळख पटली आहे. हे सर्व मजूर राजस्थानच्या बांसवाडा जिह्यातील आहेत. ते बांधकामांच्या रोजगारासाठी सुरतमध्ये मुक्काम करून होते. अपघातात 2 वर्षांची एक बालिका आणि 1 वर्षाच्या मुलाचा मात्र दुःखद अंत झाला आहे. मृत मजुरांपैकी राकेश रुपचंद नेहमी आपल्या मालकाच्या दुकानाजवळ झोपतो.पण काळ मात्र तो अन्य सहकाऱयांसोबत फुटपाथवर झोपला आणि काळाने त्याच्यावर झडप घातली. डंपरने फुटपाथवरील 4-5 दुकानांचीही मोडतोड केली आहे. मृत मजुरांत राजस्थानच्या भगतपुरा गावातील एकाच कुटुंबातील 5 जण आहेत.


























































