विद्यार्थ्यांनो भाजपमध्ये सहभागी व्हा, कॉलेजच्या प्रीन्सिपलने तुघलकी फर्मान काढल्याने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील एका महिला कॉलेजच्या प्रीन्सिपलने एक तुघलकी फर्मान काढल्याने खळबळ उडाली. प्रीन्सिपलने विद्यार्थ्यांना भाजपमध्ये सहभागी होण्याची थेट नोटीस काढली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कॉलेज प्रशासनाने तत्काळ कारवाई करत विद्यापीठाच्या व्हाईस चान्सलरला आणि प्रीन्सिपलला नोटीस पाठवली. यानंतर प्रीन्सिपलने राजीनामा दिला आहे.

भावनगर येथील नर्मदाबाई चत्रभुज गांधी महिला कॉलेजच्या (NC Gandhi College) प्रीन्सिपल रजनीबाला गोहील यांनी एक नोटीस काढली होती. यात त्याने विद्यार्थीनींना पासपोर्टा साईज फोटो आणि मोबाईल फोन कॉलेजमध्ये घेऊन येण्यास सांगितले होते. भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व घेण्याचे विद्यार्थीनींना सांगण्यात आले होते. या नोटीसचा फोटो सोमवारी व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली.

गेल्या शुक्रवारी प्रीन्सिपल रजनीबाला गोहील यांनी ही नोटीस जारी केली होती. कॉलेजच्या प्रत्येक विद्यार्थीनींना सुचित करण्यात येते की भाजपचे सदस्यत्व घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थीनीने नोंदणीसाठी आपला एक पासपोर्ट साईज फोटो आणावा. तसेच भाजपच्या सदस्य नोंदणीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थीनीने आपला मोबाईल फोन घेऊन कॉलेजमध्ये यावे, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले होते. नोटीसच्या शेवटी फक्त भावनगर महानगर पालिका क्षेत्रामध्ये राहणाऱ्या विद्यार्थीनीच भाजपचे सदस्यत्व मिळवण्यासाठी पात्र आहेत, असेही नमूद करण्यात आले होते.

प्रीन्सिपल रजनीबाला गोहील यांची ही नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाली. भावनगरमधील कॉलेजचे संचालन करणाऱ्या चॅरिटेबल ट्रस्ट श्रीमती रुक्मिणीबहन दिपचंद गार्डी भावनगर स्त्री केलवानी मंडळाचे कार्यकारी निर्देशक धिरेंद्र वैष्णव यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना आपल्या या नोटीसबाबत रविवारी माहिती मिळाल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी कॉलेजच्या प्रीन्सिपलशी चर्चा केली आणि त्यानंतर प्रीन्सिपलने राजीनामा दिला.

धिरेंद्र वैष्णव यांनी रजनीबाला गोहील यांचा बचाव करताना त्यांनी अज्ञानातून ही नोटीस जारी केल्याचे म्हटले. यामागे कोणताही वाईट हेतू नव्हता, असेही ते म्हणाले.