गुजरात काँग्रेसही फुटीच्या मार्गावर, पाच आमदारांचे राजीनामे; घोडेबाजाराची चिंता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशपाठोपाठ गुजरातमध्येही काँग्रेसला फुटीचे ग्रहण लागले आहे. ऐन राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. काँग्रेसला घोडेबाजाराची चिंता सतावत असून आपल्या उर्वरित आमदारांना राजस्थानला पाठवले आहे.

गुजरातेत राज्यसभेच्या चार जागांसाठी 26 मार्च रोजी निवडणूक होत आहे. विधानसभेत एकूण 180 संख्याबळ असून भाजपकडे 106 तर काँग्रेसकडे 69 आमदार आहेत. निवडणूक ऐन तोंडावर आलेली असतानाच काँग्रेसच्या प्रवीण मारू, मंगल गावीत, सोमाभाई पटेल, जे. व्ही. काकडिया तसेच प्रद्युम्न जडेजा यांनी रविवारी राजीनामे दिले. पाच आमदारांनी बंडखोरी करताच काँग्रेसमध्ये उर्वरित आमदार वाचवण्यासाठी धावपळ सुरू झाली.

पळवापळवी टाळण्यासाठी…
काँग्रेसने आपल्या आमदारांची पळवापळवी टाळण्यासाठी खबरदारी घेतली आहे. यातील 14 आमदार जयपूरला पाठवले असून 36 आमदारांना उदयपूरला पाठवण्यात येणार आहे. पाच आमदारांना गुजरातेतीलच रिसॉर्टमध्ये ठेवण्यात येणार आहे. जवळपास 18 आमदार हे गुजरातमध्येच राहणार असून ते विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.

आमदारांमध्ये नाराजी कशावरून?
राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पाटीदार समाजाला संधी न दिल्यामुळे आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनीही काँग्रेसवर हाच आरोप केला. काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळय़ांचा फायदा भाजपला होणार असल्याचे एकीकडे बोलले जात आहे, तर भाजपला या घोडेबाजारात यश येणार नसल्याचा दावा काँग्रेस नेते भरतसिंह सोळंकी यांनी केला आहे.

  • सध्याचे संख्याबळ पाहता भाजप 2 आणि काँग्रेस 1 जागा सहज जिंकू शकते. मात्र काँग्रेसच्या दोन आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यास भाजपचा तिसरा उमेदवारही जिंकण्याची शक्यता आहे. भाजपकडे 106 आमदार असून तिसरा उमेदवार जिंकून आणण्यासाठी त्यांना फक्त दोन अतिरिक्त मतांचीच गरज आहे.