राज्यसभा निवडणूक घोडेबाजाराच्या भीतीने गुजरात काँग्रेसने 37 आमदारांना जयपूरला हलवले

गुजरातमधील राज्यसभेच्या चार जागांसाठी होणाऱया निवडणुकीआधीच 5 आमदारांनी पक्षाचे राजीनामे दिल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरत आता गुजरात काँग्रेसने आपल्या 37 आमदारांना जयपूर येथील शिव विलास रिसॉर्टमध्ये पाठवले आहे. राज्यसभा निवडणुकीत आमदारांचा घोडेबाजार होऊ नये यासाठी ही दक्षता घेतल्याचे काँग्रेस श्रेष्ठाRनी स्पष्ट केले. काँग्रेसने आणखी 25 आमदारांचा गट जयपूरला येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसच्या 5 आमदारांनी आपले राजीनामे देत पक्षाला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे काँग्रेसने आता राज्यसभेच्या चारपैकी एक जागा राखण्यासाठी दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून आपल्या 37 आमदारांना त्यांनी काँग्रेसची सत्ता असलेल्या सुरक्षित स्थळी जयपूर या राजस्थानच्या राजधानीत हलवले आहे. आमदार फुटीच्या धोका लक्षात घेता काँग्रेसने राज्यसभेसाठीचे मतदान होईपर्यंत आपल्या आमदारांना एकजूट ठेवण्यासाठी गुजरातबाहेर हलवले आहे.

पाच आमदारांची काँग्रेसमधून हकालपट्टी

रविवारी अचानक आपल्या आमदारकीचा राजीनामा देत पक्षाला धक्का देणारे प्रवीण मारू, मंगल गावीत, सोमाभाई पटेल, जे. व्ही. काकडिया आणि प्रदुमन जाडेजा या पाच आमदारांची काँग्रेसने सोमवारी पक्षातून हकालपट्टी केली आहे. मात्र आता विधानसभेत काँग्रेसचे बळ घटल्याने राज्यसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपची स्थिती मजबूत झाली आहे.

काय आहे गुजरातमधील समीकरण

आताच्या संख्या समीकरणानुसार भाजपचे 2 आणि काँग्रेसचा 1 उमेदवार राज्यसभेवर सहज निवडून येऊ शकतो. कारण एका जागेसाठी 36 मते पुरेशी आहेत. मात्र काँग्रेसचे 2 आमदार जरी मतदानात फुटले तर भाजपचे सर्व 3 उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. गुजरात विधानसभेचे बलाबल पाहता भाजप आघाडीकडे भाजप 103, राष्ट्रवादी काँग्रेस 1 आणि भारतीय ट्रायबल पार्टी 2 अशी 106 मते आहेत. तर काँग्रेस आघाडीकडे काँग्रेस 68 व अपक्ष जिग्नेश मेवाणी 1 अशी 69 मते आहेत. अशा स्थितीत काँग्रेसमधील फुटीमुळे भाजपचे पारडे जड झाले आहे. राज्यसभेच्या 4 जागांपैकी त्यांचे उमेदवार 3 जागांवर विजय मिळवू शकतील असे संकेत आहेत. भाजपने अभय भारद्वाज, रमिवाबेन बारा आणि नरहरी अमीन यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने शक्तीसिंह गोहिल आणि भरत सिंह सोळंकी यांना उमेदवार बनवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या