गुजरातमध्ये सतीच्या 13 प्रकरणांच्या नोंदीने खळबळ, वाचा बातमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पतीचं निधन झाल्यानंतर त्याच्याच चितेवर त्याच्या पत्नीने जाळून घेण्याची सती नावाची एक अघोरी प्रथा काही दशकांपूर्वी आपल्या देशात अस्तित्वात होती. तिचे कायदेशीररित्या समूळ उच्चाटन करण्यात आलं. असं असताना, गुजरातमधील एका जिल्ह्यात सतीच्या 13 प्रकरणांची नोंद झाल्याने खळबळ माजली आहे.

गुजरात येथील अमरेली जिल्ह्यात सतीच्या 13 प्रकरणांची नोंद झाल्याचं आढळल्याने पोलीस अधिक्षकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. गुजरातच्या अधिकृत वेबसाईटवर 2015 ते 2020 दरम्यान सती प्रकरणांची शून्य अशी नोंद आहे. पण, 2021 मध्ये गुजरात येथील अमरेलीमध्ये मात्र थोडीथोडकी नव्हे तर 13 प्रकरणांची नोंद करण्यात आल्याने खळबळ उडाली.

याची चौकशी करण्यात आली, तेव्हा ही नोंद म्हणजे मानवी चूक असल्याचं निदर्शनाला आलं. गुन्ह्यांची आकडेवारी देणारी माहिती लिहित असताना एका कॉन्स्टेबलने 13 हा आकडा चुकून सती या विभागात लिहिला. तो आकडा जिल्ह्यातील आत्महत्या विभागात नोंदवणं अपेक्षित होतं, पण तो सती या विभागात नोंदवला गेला. त्यामुळे या जिल्ह्यात 13 जणी सती गेल्याची चुकीची माहिती प्रसारित झाली.

अमरेलीचे पोलीस अधीक्षक निर्लिप्त राय यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ही नोंदवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची चूक आहे. तरीही मी तपशीलवार चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती राय यांनी दिली आहे.