तुम्ही विश्वास गमावलाय! नारायण साई याची अंतरीम जामीनासाठीची याचिका फेटाळली

आसाराम बापू याचा मुलगा नारायण साई याने अंतरीम जामीनासाठी दाखल केलेली याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. आसाराम बापू याला बलात्काराच्या प्रकरणात शिक्षा झाली असून तो या प्रकरणी तुरुंगवास भोगतो आहे. आपल्या वडिलांची तब्येत बरी नसून त्यांची काळजी घेण्यासाठी आपल्याला जामीन हवा असल्याची याचिका नारायण साई याने दाखल केली होती. न्यायमूर्ती एएस सुफेरिया आणि न्यायमूर्ती विमल व्यास यांच्या खंडपीठापुढे सदर प्रकरण सुनावणीसाठी आले होते.

नारायण साई याने गुजरात उच्च न्यायालयात खोटी वैद्यकीय कागदपत्रे सादर केली होती. त्याने खोटी कागदपत्रे दिल्याचे उघड झाल्याने गुजरात उच्च न्यायालयाने त्याला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. सदर प्रकरण लक्षात घेता तुम्ही विश्वासपात्र नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळताना म्हटले की “खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्यावर आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा ? तुमचे म्हणणे आहे की आसाराम बापू यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू असून वैद्यकीय कागदपत्रांमध्ये त्यांची प्रकृती खालावली असल्याचे कुठेही दिसत नाही. आम्ही या याचिकेबाबत अजिबात संतुष्ट नाहीयोत. ” आसाराम याची प्रकृती खालावली असून तो अत्यवस्थ असल्याचे वैद्यकीय कायदपत्रांतून दिसत असेल तरच नव्याने अर्ज करा असे निर्देश नारायण साई याच्या वकिलांना देण्यात आले आहे.

आपल्या वडिलांची काळजी घ्यायची आहे या सबबीखाली नारायण साई यांनी दाखल केलेल्या जामीनाच्या याचिकेवर बोलताना खंडपीठाने म्हटले की, आसाराम याला दोन मुली आहे ज्या त्याची काळजी घेऊ शकतात. मुली या मुलापेक्षा आईवडिलांची काळजी अधिक घेऊ शकतात असे मत न्यायमूर्ती सुफेरिया यांनी नोंदवले.