
एकिकडे वैवाहिक बलात्कारावर उहापोह सुरू असताना दुसरीकडे बलात्कार हा बलात्कारच असतो, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी गुजरात उच्च न्यायालयाने केली आहे. देशात वैवाहिक बलात्काराला गुन्ह्याच्या कक्षेत आणल्या जाण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ही टिप्पणी महत्त्वाची मानली जात आहे.
वैवाहिक बलात्कार हा गुन्हा घोषित व्हावा या मागणीसाठी अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. भारतीय दंड विधानाच्या कलम 375 अन्वये 18 वर्षावरील महिलेवर पतीकडून झालेली लैंगिक जबरदस्ती ही बलात्काराच्या कक्षेत येत नाही. या विधानाशी असहमती दर्शवत गुजरात उच्च न्यायालयाने एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे.
बलात्कार हे एक घृणास्पद कृत्य आहे. ते कुणाकडूनही होणं चूकच आहे. बलात्कार हा बलात्कारच आहे, मग तो नवऱ्याकडून बायकोवर केलेला का असेना. त्याला गुन्ह्याच्या कक्षेत आणणं गरजेचं आहे. 50 अमेरिकन राज्यं आणि तीन ऑस्ट्रेलियन राज्यांसह अनेक देशांमध्ये वैवाहिक बलात्कार हा अवैध मानला जातो, असं गुजरात उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
























































