
गुजरातच्या बोताडमध्ये विषारी दारुमुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे.
बोताडमध्ये काही जणांनी विषारी दारू प्यायल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपासाला सुरुवात केली आहे. ही दारू कोठून आली, कोणाकडून मिळाली, याचा तपास पोलीस करत आहे. गेल्या काही वर्षापासून गुजरातमध्ये दारुबंदी असताना ही दारू नेमकी कोठून आली, असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.
रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.मात्र, काहीजणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. आगामी काळात गुजरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अनेक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. त्यामुळे हा मुद्दा निवडणुकीत गाजण्याची शक्यता आहे.























































