
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
अनेकदा रस्त्याच्या डाव्या बाजूने गाडी चालवण्या ऐवजी काही जण विरुद्ध दिशेने गाड्या चालवतात. मात्र आता असे नियम तोडून गाडी चालवल्यास तुम्हाला कडक शिक्षा होऊ शकते. महत्वाची बाब म्हणजे तुम्ही याच गुन्ह्यात दोन वेळा पकडले गेल्यास तुमचा गाडी चालवण्याचा परवाना म्हणजे लायसन्स कायमचे रद्द होऊ शकते. त्यामुळे गाडी चालवण्यास तुमच्यावर आजीवन बंदी येऊ शकते. हा नियम सध्या गुजरातमध्ये लागू करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी 18 डिसेंबर रोजी सात जणांचे परवाने अशा प्रकारे रद्द करण्यात आले आहेत.
टीओआयने दिलेल्या वृत्तानुसार पहिल्यांदा विरुद्ध दिशेने गाडी चालवत असल्यास त्याला दंड आणि समज देण्यात येते. पण पुन्हा सापडल्या त्या व्यक्तीचा परवाना रद्द करण्यात येतो. या पूर्वी पाच वेळा असा गुन्हा घडल्यास परवाना रद्द करण्यात यायचा. मात्र आता नियमावलीत बदल करण्यात आले असून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक कठोर पाऊले उचलण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
वाहतूक पोलिसांच्या हेल्मेटवर कॅमेरे
अनेकदा नियम तोडल्यानंतर चालकाकडून आपण तसे केले नसल्याचा दावा सर्रास करण्यात येतो. मात्र चूक नक्की कुणाची हे लक्षात यावे म्हणून वाहतूक पोलिसांना आता कॅमेरे बसवलेले हेल्मेट देण्यात आले आहेत. त्यामुळे खरे दोषी कोण ते ओळखण्यास तात्काळ मदत होईल.
























































