शिक्षण विभागाचे ‘वंदे गुजरात’; शिक्षकांना गुजराती चॅनेलवर व्हर्च्युअल प्रशिक्षण देण्याचा ‘विनोद’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vinod-tawde-look

सामना प्रतिनिधी, मुंबई

शालेय शिक्षण विभागाने पुन्हा एकदा ‘गुजरात’चा नारा दिला आहे. 24 सप्टेंबरपासून पहिली ते आठवीच्या शिक्षकांना बदललेल्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कहर म्हणजे हे प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षण विभागाच्या ‘विद्या प्राधिकरणा’ने दूरदर्शनच्या मराठी सह्याद्री वाहिनीला डावलून गुजरातच्या ‘वंदे गुजरात’ या चॅनेलची निवड केली आहे. गुजराती चॅनेलवरून राज्यातील शिक्षकांना मराठीतून प्रशिक्षण देण्याच्या विनोदामुळे शिक्षण विभाग अडचणीत सापडला आहे.

24 ते 26 सप्टेंबर या कालावधीत राज्यभरातील 63 हजार डिजीटल शाळांमधून शिक्षकांना पहिली व आठवीच्या सर्व विषयांच्या बदललेल्या अभ्यासक्रमाचे तसेच नवीन पाठयपुस्तकांचे प्रशिक्षण व्हर्चुअल पद्धतीने डीडी डायरेक्ट फ्री डीटीएच द्वारे देण्यात येणार आहे. तसेच या प्रशिक्षणाचे प्रक्षेपण जिओ टीव्हीच्या मोबाईल ऍपमध्ये देखील पाहता येणार आहे. ‘वंदे गुजरात’ हे गुजराती चॅनेल महाराष्ट्रात प्रसारित होत नाही. त्यामुळे हे चॅनेल पाहण्यासाठी डिश बॉक्स बसवावा किंवा जिओ टिव्ही ऍपमधील वंदे गुजरात हे चॅनेल पहावे असे आदेश शिक्षण विभागाने काढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

आठवीच्या शिक्षकांचे प्रशिक्षण -24 ते 26 सप्टेंबर
पहिलीच्या शिक्षकांचे प्रशिक्षण – 27 व 28 सप्टेंबर

प्रशिक्षणासंदर्भात विद्या प्राधिकरणाने दिलेल्या सूचना
प्रत्येक शाळेत दूरदर्शन व डीटीएचची सुविधा, अथवा मोबाईल स्क्रिन प्रोजेक्टरची सुविधा असावी.
विद्युतपुरवठा/इनव्हटर
ध्वनीक्षेपणयंत्रणा

राष्ट्रवादीचीही टीका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनीही टीका केली आहे. शिक्षण विभागाने दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीला डावलून वंदे गुजरातची निवड केली आहे. सरकारला गुजराती भाषेचेयेवढेच प्रेम असेल तर महाराष्ट्राची राज्यभाषा गुजराती आणि गांधीनगर राजधानीच करून टाका. सरकारच्या या गुजराती व जीओ प्रेमाचे धिक्कार असे मुंडे म्हणाले.

विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी दिलेले स्पष्टीकरण
महाराष्ट्राच्या विद्या प्राधिकरणप्रमाणे गुजरातचेही स्वतंत्र विद्या प्राधिकरण आहे. या प्राधिकरणाद्वारे ‘वंदे गुजरात’ हे शैक्षणिक चॅनेल सुरू करण्यात आले आहे.
पहिली ते आठवीच्या शिक्षकांचे प्रशिक्षण एकूण 29 तासांचे असून या चॅनेलवरून हे प्रशिक्षण देण्याची सोय मोफत उपलब्ध झाली आहे.
‘सह्याद्री’ वाहिनीवरून हे प्रशिक्षण देण्यासाठी ऑफ टाइममध्येदेखील किमान 1 कोटी 76 लाख रुपये खर्च आला असता.

चीन-पाकिस्तानकडून प्रशिक्षण नाही
गुजरात सरकारच्या ‘वंदे गुजरात’ या शैक्षणिक चॅनेलच्या माध्यमातून शिक्षकांना मोफत प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांचा खर्चही राज्य सरकारला द्यावा लागणार नाही. जर गुजरात सरकार अशा प्रकारचे डिजिटल प्रशिक्षण विनाशुल्क उपलब्ध करून देत असेल तर या प्रशिक्षणावर राज्य सरकारकडून होणाऱ्या खर्चामध्ये नक्कीच बचत होईल. बचत झालेल्या पैशातून इतर शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येईल. चीन किंवा पाकिस्तानमधून हे प्रशिक्षण दिले जात नाही ना?
-विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री

summary-gujarati-channel-for-marathi-teachers training