
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ह्यूस्टन येथील ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमाची जगभराने दखल घेतली आहे. हातात हात घातलेले मोदी आणि ट्रम्प यांचे फोटोही सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहेत. हाच ट्रेंड यावेळी गुजरातमधील गरब्यातही बघायला मिळणार आहे. नवरात्रीसाठी येथील तरुणींनी पाठीवर मोदी आणि ट्रम्प यांचे टॅटू काढले असून त्यातून त्या ‘वसुधैव कुटुम्बकम’चा संदेश देत आहेत.
नवरात्रौत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे देशभरात नवरात्रीच्या स्वागताची तयारी सुरू आहे. गरब्याची राजधानी असलेल्या गुजरातमध्येही तरुण तरुणी गरब्याची प्रॅक्टीस करण्यात दंग झाले आहेत. गरबा शिकण्यासाठी इतर राज्यातील तरुण तरुणीही येथे मोठया प्रमाणावर येत आहेत. पण यावेळी या गरब्यावर ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमाची छाप असणार आहे. कारण येथील तरुण तरुणींमध्ये पाठीवर मोदी आणि ट्रम्प यांचे टॅटू काढण्याची स्पर्धाच लागली आहे.
























































