
गीर येथील अभयारण्यात उन्नत रेल्वे मार्ग आणण्याचा प्रस्ताव गुजरात सरकारने रेल्वे मंत्रालयाकडे केला आहे. येथील सिंहांच्या संवर्धनासाठी हा प्रस्ताव असल्याची माहिती मिळत आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरातच्या वन विभागाने या उन्नत रेल्वे मार्गासाठी सरकारकडे प्रस्ताव ठेवला होता. महाराष्ट्र आणि पेंच टायगर रिझर्व्हमधील महामार्ग क्र. 44 नजीक असाच एक उन्नत रेल्वे मार्ग आहे. वाघांच्या संरक्षणासाठी तो बांधण्यात आला आहे. त्याच धर्तीवर हा रेल्वेमार्ग उभारण्यात येणार आहे.
या प्रकल्पात ससान ते कछिया दरम्यान 14 किमी लांबीचा रेल्वेमार्ग असणार आहे. हा मार्ग अभयारण्याच्या मधून जाईल. त्यासाठी वन विभागाने रेल्वे मंत्रालयासोबत बोलणी सुरू केली असून सध्या या प्रकल्पाच्या आर्थिक बाबी तपासण्यात येत आहेत. त्यानंतर हा प्रस्ताव पुढील चर्चेसाठी पाठवण्यात येईल.
गीर अभयारण्य हे संरक्षित वनक्षेत्र असल्याने येथे अशा प्रकारच्या बांधकामासाठी विशेष परवानगी लागणार आहे. त्यासंबंधी चर्चाही सुरू झाल्या आहेत. या बाबतीत गुजरात उच्च न्यायालयात स्युमोटो याचिका दाखल झाली असून त्याच्या सुनावणी वेळी वन विभाग आणि गुजरात सरकारतर्फे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे.




























































