हा तर देवकरांचा प्रसिद्धीसाठी खटाटोप, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सुनावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जळगाव

शिवसेनेचे उपनेते, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव व धरणगाव तालुक्यात कोट्यावधी रुपयांची विकास कामे मंजुर करुन प्रत्यक्ष कामांना सुरुवात केल्यामुळे राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना पोटसुळ उठले आहे. संपुर्ण जळगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला आहे, तर धरणगाव तालुक्यातील दोन मंडळात दुष्काळ घोषीत करण्यासाठी राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे प्रयत्नशील आहेत. मात्र, दुष्काळावर बोलून पक्षात आणि जनतेत किंमत वाढत नसते हे देवकरांनी ध्यानात घ्यावे असा पलटवार शिवसेनेचे धरणगाव तालुकाप्रमुख गजानन पाटील, पंचायत समिती सदस्य मुकुंदराव ननवरे यांनी केला आहे.

शिवसेना उपनेते सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव व धरणगाव तालुक्यातील पायाभुत सुविधा, आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी, रस्ते, शेतीसाठी सिंचन व्यवस्था तसेच सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी विविध कामांसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे. गुलाबराव पाटील यांनी मंत्री पदाची गरिमा राखून सर्वसामान्य नागरिकांसोबत जुळलेली नाळ कायम ठेवून जमिनीवरचे नेते असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांचा जनासामान्यांशी असलेला दांडगा संपर्क व त्यांची केलेली कामे यामुळे राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. नाव न घेता देवकर यांनी राज्यमंत्री पाटील यांच्यावर केलेल्या टिकेचा शिवसेनेने जोरदार समाचार घेतला आहे.

शिवसेनेचे धरणगाव पंचायत समिती सदस्य मुकुंदराव ननवरे, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गुलाबराव पाटील यांनी नेहमीच शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आणि मंत्री पद व आमदारकीच्या माध्यमातून शासनामार्फत शेतकरी व जनतेच्या भल्याचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच जनतेने गुलाबराव पाटील यांना चौथ्यांदा त्यांच्यावर विश्वास ठेऊन निवडूण दिले असून एकाच टर्ममध्ये देवकरांना राजकीय बेरोजगार व्हावे लागले असा टोला शिवसेनेने लगावला आहे. देवकर यांची जनतेत आणि पक्षात देखील पत उरली नसून राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टिका करुन प्रसिध्दीचा खटाटोप त्यांनी चालविला आहे.

संपुर्ण जळगाव तालुका या आधीच दुष्काळग्रस्त जाहीर झाला आहे. तर धरणगाव तालुक्यातील दुष्काळातुन वगळलेल्या तीन पैकी एका मंडळात दुष्काळ घोषीत झाला आहे. उर्वरित दोन मंडळांमध्ये देखील राज्यमंत्री पाटील यांच्या प्रयत्नाने दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता असून दुष्काळाबाबत देवकरांनी चिंता करु नये, असेही या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे. पद गेल्यामुळे देवकरांना पक्षात राजकीय दुष्काळाला सामोरे जावे लागत असून दुष्काळ जाहीर झाल्यावर आंदोलनाची नौटंकी करणे म्हणजे वराती मागुन काढण्यात आलेले घोडे असल्याची टिकाही शिवसेनेने केली आहे.