गुलशन कुमार हत्या प्रकरण, आरोपी अब्दुल रौफची जन्मठेपेची शिक्षा हायकोर्टाकडून कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी-सीरिज कंपनीचे मालक गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी मारेकरी अब्दुल रौफ ऊर्फ दाऊद मर्चंट याला दिलासा देण्यास हायकोर्टाने आज नकार दिला. पॅरोलदरम्यान रौफ पळून गेला होता तसेच त्याचे वर्तन पाहता तो माफीसाठी पात्र नसल्याचे स्पष्ट करत सत्र न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा हायकोर्टाने आज कायम ठेवली. दरम्यान, टिप्स कंपनीचे मालक रमेश तौराणी यांना निर्देष तर आरोपी अब्दुल मर्चंटचे निर्देषत्व हायकोर्टाने रद्द केले आहे.

गुलशन कुमार हत्याप्रकरणी न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने आज याबाबत राखून ठेवलेला निर्णय जाहीर केला. रौफ याची जन्मठेपेची शिक्षा रद्द करण्यास खंडपीठाने नकार दिला असला तरीही त्याचे अपील हायकोर्टाने अंशतŠ मान्य केले आहे. त्यानुसार हायकोर्टाने आयपीसी कलम 392(मोठय़ा प्रमाणात चोरी), कलम 397 (लूट करणे) रद्द केली आहेत. मात्र, आयपीसी कलम 302(हत्या) आणि इतर कलमांतर्गत शिक्षा कायम ठेवली आहे. तर अन्य आरोपी अब्दुल मर्चंटविरोधातील राज्य सरकारने केलेले अपील खंडपीठाने अंशतः मान्य केले आहे. या आरोपीलाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून आठवडाभरात मुंबई सत्र न्यायालयात अथवा अंधेरीतील डी.एन. नगर पोलिसांसमोर शरणागती पत्करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. त्याचबरोबर पासपोर्टही जमा करण्याचे खंडपीठाने निकालपत्रात नमूद केले आहे.