गुलकंदामुळे तुमचा चेहरा उजळेल..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिसायला आकर्षक आणि सुवास देणाऱ्या गुलाबाच्या फुलाचे आपल्या त्वचेसाठी देखील अनेक फायदे आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गुलाब पाण्याच्या वापराने त्वचेला थंडावा मिळतो. गुलाबाच्या पाकळ्यांचे अनेक उपयोग आहेत. गुलाब पाण्याचा स्वयंपाकात तसंच सरबतामध्ये वापर केला जातो. विविध फेस पॅकसाठी गुलाब पाणी वापरणं फायदेशीर ठरतं. वाळलेल्या गुलाब पाकळ्यांचा विविध स्विट डीशमध्ये स्वाद वाढवण्यासाठी उपयोग केला जातो. यासोबतच गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार करण्यात आलेल्या गुलकंदाची चव तर अनेकांना आवडत असेलच. जिभेची चव वाढवणाऱ्या या गुलकंदाचे देखील त्वचेसाठी अनेक फायदे आहेत.

गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीइंफ्लेमेटरी गुण असतात. यामुळे शरीर डिटॉक्स करण्यासोबत अनेक समस्या कमी होण्यास मदत होते. गुलकंद हा केवळ खाण्यासाठी नाही तर गुलकंद त्वचेवर लावल्याने देखील अनेक फायदे होतात. तेव्हा जाणून घेऊयात गुलकंदाचे त्वचेसाठी फायदे

चेहऱ्यावरील डागांसाठी साठी गुलकंद स्क्रब
चेहऱ्यावरील डागांची समस्या दूर करण्यासाठी गुलकंद स्क्रब लावणं अनेक प्रकारे गुणकारी ठरू शकतं. गुलकंद अँटी-बॅक्टेरियल असल्याने त्वचेवरील बॅक्टेरियल इंफेक्शन कमी होऊन पुळ्या कमी होवू शकतात. तसचं चेहऱ्यावरील डेड स्किन काढून चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी गुलकंद मदत करतो. गुलकंदामध्ये थोडं चंदन आणि लिंबाचे काही थेंब टाकून ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी. चेहरा चांगला स्क्रब करावा त्यानंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवावा.

गुलकंद आणि दूधाचा फेसपॅक
गुलकंदमध्ये दूध मिसळून ते चेहऱ्याला लावल्यास पिग्मेंटेशनची समस्या दूर होते. यामुळे ब्लड सर्क्यूलेशन वाढण्यासही मदत होते आणि चेहरा उजळतो. गुलकंदामध्ये चमचाभर कच्चे दूध मिसळून चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करावा. थोडा वेळ ठेवून चेहरा स्वच्छ धुवावा.

डार्क सर्कल्स कमी करेल
डार्क सर्कलमुळे अनेकजण चिंतेत असतात. या डोळ्या भोवतीच्या काळ्या वर्तुळांमुळे अनेकदा चेहऱ्याच्या सौदर्यावर प्रभाव पडतो. अशा वेळी गुलकंद तुमच्या उपयोगी येऊ शकतं. गुलकंद थोडा पाण्यात मिसळावा. त्यानंतर दोन कापसाचे बोळे यात भिजवून ते डोळ्यांखाली ठेवावे. रोज रात्री १० मिनिटांसाठी हे गुलकंदामधील कापसाचे बोळे डोळ्या खाली ठेवल्यास डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होईल. याशिवाय गुलाबाच्या पाकळ्यांचे तसेच गुलकंदचे त्वचेसाठी काही इतरही फायदे आहेत. गुलकंदामुळे त्वचेवरील जळजळ कमी होण्यासही मदत होते. यामुळेच उन्हाळ्यात त्वचेसाठी गुलकंदाचा वापर उपयुक्त ठरू शकतो. गुलकंद त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करतो . यामुळे चेहरा हायड्रेट राहतो. डार्क सर्कलसोबतच गुलंकंदामुळे डोळ्या खालची सूज कमी होण्यासाठी देखील मदत होते.

गुलकंद चेहऱ्यासाठी टोनर म्हणूनही करणं शक्य आहे. यामुळे तुमच्या त्वचेचा pH बॅलेन्स राखण्यास मदत होईल. एका स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही गुलाब पाणी आणि काही वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या टाकून या पाण्याने चेहऱ्यावर स्प्रे केल्यास चांगला फायदा होईल. चेहऱ्यावर गुलकंद लावल्याने टॅनिंग कमी होण्यास मदत होते. चेहरा तसचं गळ्याभोवतीचा काळेपणा कमी करण्यासाठी गुलकंद उपयुक्त आहे. मुरुम किंवा पिम्पल्स मुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग फिके करण्यासाठी आणि चेहरा उजळण्यासाठी गुलकंद फायदेशीर आहे. गुलकंद चेहऱ्याला लावण्यासोबत गुलकंदाच्या सेवनामुळे देखील त्वचेला फायदे होतात. गुलकंद रक्त शुद्धीकरणाचं काम करत. यासाठी रोज सकाळी गुलाबाचे पाणी प्यावं.यामुळे चेहऱ्याला आतून पोषण मिळेल आणि चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होईल