
>> तरंग वैद्य
आयुष्यातील चांगल्या आठवणींचे किस्से कायम स्मरणात राहतात. हे किस्से, या आठवणी कठीण प्रसंगी आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊन जातात. नवरा-बायको आणि दोन मुलं अशा चौकोनी मध्यमवर्गीय परिवाराच्या आठवणींचे किस्से अलगद पण खुमासदार पद्धतीने मांडणारी गुल्लक ही वेबसीरिज. गुल्लकमधून बाहेर पडणारे सामान्य, मध्यमवर्गीय अशा मिश्रा परिवाराच्या आयुष्यात घडलेले किस्से म्हणजे प्रेक्षकांना ‘घर घर की कहानी’ वाटावे असे आहेत. हेच या मालिकेचे यश आहे.
आपल्या घरात मुलं थोडी मोठी, समजदार झाली की त्यांना पैसे ठेवण्याची पेटी दिली जाते ज्यात ते त्यांच्या वाढदिवसाची भेट म्हणून आलेले पैसे, मिळालेला पॉकेट मनी ठेवू शकतात. थोडक्यात त्यांना बचतीची सवय लागावी म्हणून जुन्या काळापासून रुजू असलेली ही उत्तम परंपरा. घरातील स्त्रीकडे ही अशीच एक पेटी असते ज्यातले पैसे कठीण प्रसंगी उपयोगी पडून आपल्याला सांभाळून घेतात. इंग्रजी भाषेत ह्या पेटीला ‘पिगी बँक’ म्हणतात तर हिंदीत ह्या पेटीला ‘गुल्लक’ हे नाव आहे.
तर ‘गुल्लक’ ह्या नावाने सोनी लिव्ह ओटीटीवर जून 2019 मध्ये एक छानशी वेबसीरिज आली. ह्या गुल्लकमध्ये पैसे साठवले नसून आयुष्यातील चांगल्या आठवणींचे किस्से साठवले आहेत. कठीण प्रसंगी आठवणीही आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊन जातात. नवरा-बायको आणि दोन मुलं अशा चौकोनी मध्यमवर्गीय परिवाराच्या आठवणींचे किस्से अलगद पण खुमासदार पद्धतीने ह्या गुल्लकमधून बाहेर पडतात. मिश्रा परिवाराच्या आयष्यात घडलेले किस्से सर्वांना खूप आवडले आणि मग 2021 च्या सुरुवातीला गुल्लकचा दुसरा ‘सीजन’ आणि एप्रिल 2022 मध्ये सीजन तीनही आला. प्रत्येक भाग अंदाजे 20 ते 24 मिनिटांचा.
संतोष मिश्रा शासकीय नोकरीत आहेत. मिळतो तो पगार बायकोच्या हातात देऊन त्यांनी संसार तिच्यावर सोपवून दिला आहे. बायकोही घर आणि दोन्ही मुलं (मोठा कॉलेजमध्ये तर धाकटा शाळेत शिकत आहे) व्यवस्थित सांभाळत आहे, मुलांना चांगले संस्कार मिळावे ह्यासाठी प्रयत्नशील आहे. मुलंही आई वडिलांच्या आज्ञेत आहेत, पण वयोपरत्वे कधी चुकतात, मारामारी करतात तर कधी बंड करतात. नवरा-बायकोमध्येही प्रसंगी भांडण होते, रुसवे फुगवे होतात, पण शेवटी सगळे एकमेकांना समजून, सांभाळून घेतात आणि आयुष्य पुढे चालत राहतं… अशी ही थोडक्यात ‘गुल्लक’ची कथा आहे. तुम्ही म्हणाल, अहो, ही तर आमच्या घरातील कथा आहे. आपलेसे वाटणारे किस्से हेच ‘गुल्लक’चे यश आहे.
‘गुल्लक’चे एपिसोड जुन्या काळातील हम लोग, खानदान, तू तू मैं मैं, ये जो है ज़िन्दगी ह्या सीरिजची आठवण करून देतात. ह्या सर्व सीरिजमध्ये प्रत्येक भागात एक नवीन किस्सा ज्यात कधी हास्य विनोद जास्त तर कधी भावनिक प्रसंग आणि सामाजिक मूल्यं जपण्याचा संदेश. ‘गुल्लक’ने ही परंपरा यशस्वीरीत्या जपली आहे.
अभिनयाच्या बाबतीत बोलायचे झाले तर जमील खान, गीतांजली कुलकर्णी, वैभव गुप्ता, हर्ष मायर हे सर्व कलाकार जमील मिश्रा, गीतांजली मिश्रा, वैभव मिश्रा आणि हर्ष मिश्रा वाटतात इतके ह्या कथेत समरसून गेले आहेत. भावाभावातील भांडणं, त्यात लहान भावाला ‘लहान’ असल्याचा फायदा तर संधी मिळाली की मोठय़ाची दादागिरी हे प्रसंग वैभव आणि हर्ष दोघांनी छान रंगवले आहेत. नवरा, मुलं, घर, शेजार सगळं सांभाळताना काय तारांबळ उडते हे गीतांजली कुलकर्णींनी त्यांच्या दमदार अभिनयातून दाखवून दिले आहे. जमील खानने ‘मी भला आणि माझी नोकरी भली’ ह्या स्वभावाचा कारकून छान रंगवलाय. बायकोचे रुसवे फुगवे सांभाळणे, मुलांना समजून घेणे ह्या सर्व प्रसंगात त्यांचे कसब दिसून येतं.
महानगरातील फ्लॅट संस्कृतीमध्ये शेजारी कोण ह्याचा आपल्याला पत्ता नसतो, पण लहान शहरात शेजारधर्म अजूनही पाळला जातो. वेळ प्रसंगी शेजाऱ्यांची मदतही होते. तर अनेक वेळा त्यांची लुडबुड नकोशी वाटते, हा पैलू पण गंमतीशीर पद्धतीने अधोरेखित केला आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात नोकरीचे महत्त्व काय आणि ती टिकवणे किती गरजेचे असते हेही मार्मिक पद्धतीने मांडले आहे. परिस्थितीतील बदल आणि जबाबदारीची जाणीव झाल्यावर मुलं त्यांच्या परीने कसा प्रयत्न करतात हे काही किश्श्यांमधून दिसून येते.
थोडक्यात सांगायचे तर ‘गुल्लक’चे किस्से ‘घर घर की कहानी’ आहेत. आपल्या सर्वांच्या आयुष्यात ह्यापैकी काही किस्से घडले आहेत. त्यामुळे ही मालिका आपल्याला आपलीशी वाटते. लेखकाने प्रसंग बारकाव्यांसकट लिहिले आहेत. संवाद अतिशय साधे, आपण रोज बोलतो त्या शैलीतले असल्यामुळे खूप खरे वाटतात दिग्दर्शकांनी ही दृश्यं तितक्याच कुशलतेने चित्रित केली आहेत. पार्श्वसंगीतही प्रसंगांना साजेसे आहे तर शीर्षक गीत गुणगुणावेसे वाटणारे आहे.
एक नक्की, ‘गुल्लक’मधून बाहेर पडलेले आठवणींचे किस्से आपल्याला खो खो हसवत नाहीत किंवा धो धो रडवतही नाहीत, पण हे किस्से बघताना सतत स्मितहास्य आपल्या चेहऱ्यावर असते आणि अधून मधून डोळ्याच्या कडा नकळत पाणावतात. त्यामुळे बघितली नसल्यास ही मालिका अवश्य बघा आणि त्यातील आपलेसे वाटणाऱ्या किश्श्यांचा आनंद घ्या.
– [email protected]
(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)


























































