
हरयाणातील गुरूग्राममध्ये एक धक्कादायक घटना घडली. येथे एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरूण आणि त्याच्या पत्नीत वाद झाल्याने तरूणाने टोकाचे पाऊल उचलले. दोघांमध्ये भांडण झाल्याच्या रागातून पतीने बायकोचा गळा दाबून खून केला आणि नंतर स्वत: आत्महत्या करून जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय कुमार ( 30) असे या मृत तरूणाचे नाव असून स्वाती शर्मा (28) असे त्याच्या बायकोचे नाव होते. अजय हा उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा रहिवाशी होता, तर स्वाती पश्चिम बंगालमधील आसनसोल येथील रहिवासी होती. तीन वर्षांपूर्वीच या दोघांचे लग्न झाले होते. दोघेही गुरुग्राममधील एका आयटी कंपनीत काम करत होते.
दरम्यान अजय आणि स्वाती यांच्यात वाद झाला होता. याच रागातून अजयने आधी बायकोचा गळा दाबून हत्या केली आणि मग स्वत: चे जीवन संपवले. मात्र आत्महत्या करण्यापूर्वी त्याने त्याच्या एका मित्राला याबाबतचा व्हिडीओ पाठवला असल्याची माहिती स्वत: मित्रानेच पोलिसांना दिली.
पोलिसांनी सांगितले की त्यांना कुमारच्या मित्राचा फोन आला होता, त्याने आम्हाला सांगितले की, रविवारी दुपारी 3.15 वाजता अजयने त्याला एक व्हिडिओ पाठवला होता. यात तो आत्महत्या करणार असल्याचे त्याने म्हटले होते. त्यामुळे पोलीस तातडीने अजय आणि स्वाती यांच्या फ्लॅटवर पोहोचले. तेव्हा त्यांना स्वातीचा मृतदेह जमिनीवर पडलेला आढळला. ज्यामध्ये स्कार्फचा वापर करून तिचा गळा दाबून खून करण्यात आला होता. तर कुमार पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.