
जीममधील साहित्याची चोरी करून बनावट कागदपत्रांद्वारे साहित्य विक्री करणाऱ्या टोळीला मुंढवा पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून जीमचे साहित्य आणि ट्रक असा मिळून 23 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
प्रशांत जाधव, मानसी शिंदे, शशिकांत शिंदे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे दोन साथीदार फरार आहेत. मुंढव्यातील एका जिममधून 15 लाखांचे साहित्य चोरून नेले होते. याप्रकरणी तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन टीमसह तपास करीत होते.
त्यांनी घटनास्थळावरील मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि शहरातील 30 ते 40 कॅमेऱ्यांच्या सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींनी जिमचे साहित्य चोरी करण्यासाठी वापरलेल्या वाहनाचा शोध पोलिसांनी घेतला. त्यानंतर वाहन मालकाकडे तपास केला असता पोलिसांनी प्रशांत रघुनाथ जाधव याला अटक केली.
चौकशीत त्याने जिमचे साहित्य संभाजीनगरमधील एका जिम व्यवसायिकाला विकल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली असून दोघांचा शोध घेतला जात आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव भोसले, पोलीस निरीक्षक गुन्हे विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन, अविनाश मराठे , दिनेश राणे, दीपक कांबळे, महेश पाठक, स्वप्नाली आंबले, निलेश पालवे यांच्या पथकाने केली आहे.




























































