
सामना ऑनलाईन । बंगळुरू
माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी कर्नाटकमध्ये कधीही मध्यावधी निवडणुका होण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेस ज्याप्रमाणे वागत आहे, ते जनता बघत आहे. काँग्रेसच्या अशा वागण्यामुळे आघाडी आणखी किती दिवस टिकेल हे आपण सांगू शकत नाही. मात्र, काँग्रेसने बिघडवलेल्या वातावरणामुळे राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका होऊ शकतात असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.
काँग्रेससोबत आघाडी करण्याची आपली इच्छा नव्हती, असे जाहीर करून त्यांनी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. आपण या मतावर ठाम असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसचे नेते आमच्याकडे आले आणि म्हणाले, तुमचा मुलगा मुख्यमंत्री होणार आहे. मात्र, त्यांच्या सर्व नेत्यांची याला मंजुरी होती की नाही ते माहित नाही. आता लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसची ताकद संपल्याचे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्याकडून आघाडीला धोका नाही. मात्र, काँग्रेसच्या वागणुकीमुळे हे सरकार किती दिवस टिकेल ते आपण सांगू शकत नाही, असे ते म्हणाले. सरकार टिकवणे हे कुमारस्वामी यांच्या हातात नसून काँग्रेसच्या हातात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही आमची कॅबिनेटची एक जागा काँग्रेसला दिली आहे. त्यांच्या सर्व मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत. त्यानंतरही काँग्रेसची वागणूक जनता बघत आहे. त्यामुळे पाच वर्षे पांठिबा देण्याचे आश्वासन काँग्रेस देत असली तरी राज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. आघाडी करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांना मुख्यमंत्री बनवावे असे आपण सांगितले होते. मात्र, कुमारस्वामी यांनाच मुख्यमंत्री बनवायचे आहे, असे काँग्रेसने सांगितले. त्यामुळे आघाडी करून जेडीएस काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यात आले.
कर्नाटकमध्ये जेडीएस काँग्रेस आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत 28 पैकी 25 जागा जिंकत भाजपने काँग्रेस- जेडीएस आघाडीला मात दिल्यानंतर आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. त्यातच दोन्ही पक्षाच्या नेते सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. आता देवेगौडा यांच्याकडून कर्नाटकात मध्यावधी निवडणुकांचे सूचक संकेत देण्यात आल्याने आघाडीतील मतभेदांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
























































