
विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय झालेला नाही. निवडणूक स्वबळावर लढवायची का याबाबत कॉँग्रेस हायकामंड निर्णय घेईल. महाराष्ट्रात निवडणुकीला वेळ असून आता हा विषयच नसल्याचे स्पष्ट करत कॉँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी राज्यात स्वबळावर लढण्याच्या वावडय़ांना पूर्णविराम दिला.
महाविकास आघाडी सरकारचा घटक पक्ष असणाऱया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. मात्र, कॉँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी असा कोणताही निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीबाबत 2023 मध्ये चर्चा करण्यात येईल, असे स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळावर लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. याविषयी योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.



























































