हलबा समाजातील तरुणांचा जलसमाधीचा प्रयत्न, पोलिसांमुळे अनर्थ टळला

आरक्षणाचा अधिकार सरकारने हिरावून घेतल्याचा आरोप करीत हलबा समाजातील संतप्त युवकांनी रविवारी तांडापेठ येथील नाईक तलावात जल समाधी घेण्याचा प्रयत्न केला. सतर्क पोलिसांनी वेळीच दहा युवकांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. येणाऱ्या काळात आंदोलन अधिक हिंसक होणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

हलबा क्रांती सेनेतर्फे जल समाधी आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून पाचपावली पोलिसांनी परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवली होती. तलावाच्या प्रत्येक भागात पोलिस कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह आठ पट्टीचे पोहणारेही सज्ज होते. तलावाकडे जाणारे रस्ते बॅरिगेट्‌स लावून अडविण्यात आले होते. सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास हलबा समाजातील युवक अचानक घोषणा देत परिसरात दाखल झाले. त्यांच्यामागोमाग शेकडोंच्या संख्येने समजाबांधवही गोळा झाले. युवकांच्या मागोमाग समाजबांधव चालत असल्याने आंदोलनाला मोर्चाचे स्वरूप प्राप्त झाले. त्यांना अडविताच परिस्थिती चिघळली. “आरक्षण नाकारून सरकार आम्हाला रोज मारत आहे, आता शांततेने मरू देण्याचे आवाहन करीत युवकांनी तलावात उडी घेण्याचा प्रयत्न केला. सज्ज पोलिसांनी प्रसंगावधान राखत दहा जणांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांदरम्यान चांगलीच झोंबाझोंबी झाली. यानंतर समर्थकांनाही पोलिसांनी पिटाळून लावले.

आपली प्रतिक्रिया द्या