यंदा नैसर्गिक रंगात रंगलेल्या ‘हल्दी गणेशा’ची आराधना

शाडू ही महाराष्ट्रातील माती नाही. तिच्यात अंकुरण क्षमता नसून ती इथल्या मातीत मिसळत नसल्याचे लक्षात येताच काही वर्षांपूर्वी नाशिकचे मनोविकास तज्ञ अमोल कुलकर्णी यांनी लाल-काळ्या मातीतून अंकुर गणेश घडवले. आता त्यापुढे जावून संशोधनाअंती पर्यावरणपूरक रंगांऐवजी पूर्णतः नैसर्गिक रंगांमध्ये रंगवलेले हल्दी गणेश साकारले आहेत. त्यामुळे त्यांची सृष्टी गणेश चळवळ अधिक बळकट झाली असून गणेशभक्तांनी या हल्दी गणेशाचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे.

दहा वर्षांपूर्वी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पीओपीकडून शाडूच्या मूर्तींकडे वळावे यासाठी कुलकर्णी यांनी प्रबोधन सुरू केले. आता त्याबाबत जागरूकता वाढली आहे. दरवर्षी सुमारे दीड लाख टन शाडू माती राजस्थान आणि राजस्थान-गुजरातच्या सीमेवरील खाणीतून आपल्याकडे येते. ती आपल्या मातीत मिसळत नाही. त्यामुळेच ती शंभर टक्के आपल्या भागासाठी पर्यावरणपूरक म्हणता येणार नाही हे लक्षात आल्यानंतर 2014 साली त्यांनी लाल, काळी माती वापरून मूर्ती घडवण्यास सुरुवात केली. त्याच वर्षी शिक्षणतज्ञ सोनम वांगचूक नाशिकमध्ये आले असता त्या भेटीत त्यांनीही या निरीक्षणांना दुजोरा दिला. स्थानिक मातीच्या मूर्तींची ठिसूळता कमी करण्यासाठी काही उपाय सुचविले आणि आता स्थानिक मातीपासून दोन ते अडीच फुटी मूर्ती घडवता येत आहेत.

कुलकर्णी यांच्या मनोवेध डेव्हलपमेंट फाऊंडेशनने ही सृष्टी गणेश चळवळ यशस्वी केली आहे. त्यातील अंकुर गणेश सर्वांचा लाडका झाला आहे. त्यासाठी पर्यावरणपूरक खडय़ांचे रंग ते वापरतात. या वर्षी संशोधनाअंती हळद, पुंकू, गेरू, मुलतानी माती, ऑर्गनिक गुलाल वापरून हल्दी गणेश साकारले आहेत. त्यामुळे मूर्ती अधिक लक्षवेधी झाल्या आहेत. सर्वांना सहज परवडाव्यात म्हणून पिंमत 800 ते 2500 अशी ठेवण्यात आली आहे.

राज्यभर पोहोचणार

यंदा पुण्यामध्ये मनोवेधचे चार विक्री केंद्रे आहेत. डोंबिवली, नंदुरबार, धुळे आणि राज्याबाहेर इंदूरला मूर्ती पोहोचल्या आहेत. पुढील वर्षी या मूर्ती राज्यभर पाठविण्यात येणार आहेत.

मूर्तींमध्ये फुले, भाज्यांच्या बिया

अंकुर आणि हल्दी गणेश मूर्तींमध्ये फुले व भाज्यांच्या बिया आहेत. पुंडीत मूर्ती विसर्जित केल्यानंतर रोपटे छान बहरेल. यात झेंडू, जर्बेरा अशी विविध प्रकारची फुले, पाले व फळभाज्यांच्या बियांचा समावेश आहे.

डॉक्टर, इंजिनीअर, जिम ट्रेनर झाले मूर्तिकार

फाऊंडेशनच्या आठ सदस्यांनी या मूर्ती साकारल्या आहेत. त्यात डॉक्टर, इंजिनीअर, जिम ट्रेनर आणि गृहिणीदेखील आहेत. कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय त्यांनी स्वतः ही कला अवगत केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या