वन विभागाच्या दुर्लक्षामुळे राजापुरात संतप्त महिलांचा रास्ता रोको

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राजापूर

टंचाईग्रस्त राजापूरकरांना वडपाटी पाझर तलावातून पाणीपुरवठा करण्यास वनविभाग परवानगी देत नसल्याने गेल्या दोन दिवसांपासून सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाकडे वनविभागाने दुर्लक्ष केल्याने संतप्त महिलांनी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हंडे घेऊन बुधवारी राजापूर येथे रास्ता रोको केला.

येवला नांदगाव राज्यमहामार्गावर सुमारे दोन चाललेल्या रास्ता रोकोत महिला हंडे घेऊन सामील झाल्या होत्या. रास्ता रोको आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांच्या उपोषणाला भेट देत आमदार नरेंद्र दराडे यांनी मध्यस्थी केली. वनविभागाकडून वडपाटी पाझर तलावातून राजापूर गावाला पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन मिळवून दिल्यानंतर बुधवारी तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. राजापूर येथे सोमवापासून प्रमोद बोडखे, भारत वाघ, पोपट आव्हाड, बाळू अलगट, बबन अलगट आदी ग्रामस्थ उपोषणाला बसलेले होते.वडपाटी पाझर तलावातून पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी परवानगी द्यावी या मागणीसाठी उपोषणाला बसले होते.

दोन दिवस होऊनही वनविभागाने या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याने बुधवारी संतप्त महिलांनी राजापूर येथे चौफुलीवर पाणीपुरवठा योजनेसाठी परवानगी मिळावी यासाठी रास्ता रोको आंदोलन केले.दोन तासापेक्षा अधिक वेळ महिला रस्त्यावर हंडे घेऊन बसल्या होत्या. आमदार नरेंद्र दराडे यांनी उपोषणकर्त्याना भेट देऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलणे केले. आचारसंहिता संपल्यानंतर राजापूर येथील पाणीपुरवठा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन उपवनसंरक्षक अधिकारी तुषार चव्हाण यांनी आमदार दराडे यांना दिल्याने येथील उपोषण व महिलांनी केलेले रास्ता रोको मागे घेतला.वनविभागाच्या आडमुठेपणाची भुमिका असल्याने महिलांसह ग्रामस्थ संतंप्त झाले होते.