धक्कादायक! दिव्यांग महिलेला धावत्या ट्रेनमधून फेकले

681

गुजरात एक्स्प्रेसमधून एका दिव्यांग महिलेला चोरीच्या उद्देशाने चोरटय़ाने चालत्या ट्रेनमधून फेकल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी घडली. गंभीरस्वरूपात जायबंदी झालेल्या या महिलेवर नायर रुग्णालयात एकीकडे उपचार सुरू असतानाच रविवारी पहाटे अन्य एका घटनेत चोरटय़ाने मंगळसूत्र खेचल्याने धावत्या तुतारी एक्सप्रेसमधून महिला कोसळल्याची घटना घडली असून तिला कळंबोलीच्या ‘एमजीएम’ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई सेंट्रल येथे राहणाऱया तसेच दोन मुलांची आई असलेल्या नग्मा अन्सारी (31) या पोलिओग्रस्त असल्याने व्हील चेअरने सहकाऱयाच्या मदतीने प्रवास करतात. दादर येथे शुक्रवारी 3.30 वाजण्याच्या सुमारास एका मशिदीत धर्मादाय मदत मिळवण्यासाठी त्या गेल्या असताना घरी परतत असताना त्यांनी दादरहून मुंबई सेंट्रलला जाण्यासाठी गुजरात एक्स्प्रेस पकडली. या गाडीत प्लम्बिंगचे काम करण्याच्या बहाण्याने चढलेल्या इसमाने गाडीच्या खिडक्या लावून घेतल्या आणि त्यांची पर्स खेचण्याचा प्रयत्न केला. त्याने पैसे आणि मोबाईल हिसकावला. त्यास प्रतिकार केल्याने चोरटय़ाने त्यांना ट्रकवर ढकलून दिले.

एक पाय तुटला
रेल्वे रुळांवरच नगमा कोसळल्याने त्यांचा एक पाय गुडघ्यापासून तुटला. तर दुसरा पाय आणि हात फ्रॅक्चर झाला आहे. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अनेक सर्जरी करण्यात आल्या असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

‘तो’ सराईत गुन्हेगार!
आरोपीच्या वर्णनावरून तो सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्याने 14 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद ते मुंबई प्रवासा दरम्यान मानसी केळकर (62) यांना अशाच प्रकारे लुटले होते. त्या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजवरून नग्मा यांनी त्याला ओळखल्याचे मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी स्पष्ट केले. आरोपीवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला असून अपंग हक्क कायद्याचीही कलमे लावण्यात आली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या