
तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा पराभव होताना दिसत असताना हनुमा विहारी व आर अश्विन यांनी संयमी खेळी करत सामना ड्रॉ केला. हनुमा विहारी जायबंदी असताना देखील खेळत होता. त्यावरून त्याचे देशभरात कौतुक सुरू असताना भाजप खासदार व प्रसिद्ध गायक बाबुल सुप्रियो यांनी त्याच्यावर टीका केली आहे.
11 जानेवारीला बाबुल सुप्रियो यांनी ट्विट करत हनुमा विहारीवर निशाणा साधला. ‘109 चेंडूत 7 धावा केल्या. हे भयंकर आहे. हनुमा बिहारीच्या या खेळाने ऐतिहासिक विजयाची संधी तर गमावलीच पण सोबत क्रिकेटचा देखील खून केला आहे. जिंकण्याचे उदिष्ट न ठेवता खेळणं हा गुन्हा आहे’, असे ट्विट सुप्रियो यांनी केले आहे. या ट्विट सोबत त्यांनी मला क्रिकेटमधील काहीच कळत नाही अशी टीप देखील जोडली आहे.
मात्र ही टीका करताना बाबुल सुप्रियो यांनी हनुमाचे आडनावच चुकवले. त्यांनी हनुमा विहारी च्या जागी हनुमा बिहारी लिहले आहे. त्यांच्या या टीकेला उत्तर देताना हनुमाने अवघ्या दोन शब्दात त्यांना जबरदस्त उत्तर दिलं आहे. हनुमाने त्यांना ‘हनुमा विहारी’ एवढाच रिप्लाय दिला. त्याच्या हा विरेंद्र सेहवागला देखील आवडला असून त्याने ‘अपना विहारी सब पर भारी’, अशी प्रतिक्रीया दिली आहे.
रिषभ पंत, हनुमा विहारी, रवीचंद्रन अश्विन यांनी दुखापतग्रस्त असतानाही सिडनी येथील तिसऱया कसोटीत झुंजार फलंदाजी करीत ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशांना सुरुंग लावला. हनुमा विहारी व रवीचंद्रन अश्विन या जोडीने तब्बल साडेतीन तास खेळपट्टीवर ठाण मांडला आणि 259 चेंडूंचा सामना करीत 62 धावांची अभेद्य भागीदारी करताना हिंदुस्थानसाठी मोलाची कामगिरी बजावली. हिंदुस्थानी संघाने चौथ्या डावात 131 षटके फलंदाजी करीत ही कसोटी ड्रॉ राखली आणि गावसकर – बॉर्डर करंडकात 1-1 अशी बरोबरी कायम ठेवली.
ब्रिस्बेन कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य संघ
सलामीवीर – रोहित शर्मा, शुभमन गिल
तिसरा क्रमांक – चेतेश्वर पुजारा
चौथा क्रमांक – अजिंक्य रहाणे
पाचवा क्रमांक – रिषभ पंत
सहावा क्रमांक – मयांक अग्रवाल/पृथ्वी शॉ/रिद्धीमान साहा
सातवा क्रमांक – रवी अश्विन/वॉशिंग्टन सुंदर
आठ, नऊ, दहा, अकरा क्रमांक – शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, टी. नटराजन
(टीप – रवी अश्विन बाहेर गेल्यास चार वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरावे लागणार)