
सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत एका आजोबांची वरात काढण्यात आल्याचे दिसतेय. व्हिडीओ पाहून असं वाटतंय की, त्यांची ही लग्नाची वरात आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे नाहीये… प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी आजोबांनी केलेले हे आंदोलन आहे.
हरयाणा सरकारने 102 वर्षीय आजोबा दुलिचंद यांना मृत घोषित करून त्यांची पेन्शन बंद केली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून ते सरकारी कार्यालयाच्या फेऱया मारून आपण जिवंत असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र प्रशासन त्यांचे म्हणणे काही ऐकत नव्हते. या भोंगळ कारभाराला पंटाळून आजोबांनी नामी शक्कल लढवत आपण जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी पैशांच्या नोटांचा हार घालून रोहतक शहरामधून स्वतःची वरात काढली आणि राज्य सरकारकडे आपली पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. या मिरवणुकीत ढोलताशा वाजवण्यात आले होते. तर आंदोलक ‘थारा फूफा अभी जिंदा है’ अशा पाटय़ा हातात घेऊन निषेध करताना दिसत होते.

























































