हरभजनचा ‘गुगली’ हल्ला, भवितव्य ठरवणारे ते कोण?

हिंदुस्थानच्या क्रिकेटच्या गाभ्यात खोलवर चेंडू फिरवणारा माजी फिरकीवीर हरभजन सिंग यावेळी चेंडू नाही, तर शब्द टाकतोय आणि तोही जबरदस्त टर्न घेतोय. ज्यांच्या आयुष्यात स्वतःच्या नावावर एकही शतक नाही, ते आज शतकवीरांच्या आयुष्याचा हिशेब लिहितायत. याहून मोठं दुर्दैव ते कोणतं? असा हरभजनने फिरकीने बाऊन्सर टाकला.

ज्यांनी स्वतः काहीही साध्य केलं नाही, तेच आज ठरवतायत की कोहली–रोहित कधी थांबायचं, कधी नाही, हे मला केवळ अजब नाही, तर वेदनादायी वाटतं, असं म्हणत भज्जीने अनुभवाच्या बॅटने फटकाच लगावला. पण त्याचवेळी त्याने आशेचा बॅटही उंचावला – ‘ही जोडी 2027 च्या वन डे विश्वचषकापर्यंत खेळावी आणि पुन्हा एकदा हिंदुस्थानच्या क्रिकेटचा झेंडा फडकवावा,’ अशी मनापासून इच्छा व्यक्त केली.

रोहित (वय 38) आणि विराट (वय 37) सध्या केवळ वन डे या एकाच रणांगणावर तलवार चालवताहेत. तरीही ‘2027 पर्यंत टिकतील का?’ असे प्रश्न हवेत उडतायत. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी या प्रश्नावर अजून तरी कोणतीही ठाम भूमिका घेतलेली नाही.

‘हरभजनचा राग अनावर झाला होता. मीही खेळाडू होतो. माझ्याबाबतीतही असंच झालं. माझ्या अनेक सहकाऱ्यांबाबतीतही असेच घडलेय. म्हणूनच हे मला जास्त बोचतं. अशा गोष्टींवर आपण उघडपणे बोलत नाही, पण आत राख धुमसत असते,’ असं म्हणत हरभजनने मनगटावरची नसच दाखवली.

विश्वचषकाला अजून वर्षापेक्षा अधिक वेळ आहे, पण हरभजनचा विश्वास अढळ आहे.  हे दोघे नेहमीच धावा करत आले आहेत. संघाचं भन्नाट नेतृत्व केलं. आजही ते हिऱयांसारखेच चमकतायत,’ असं तो अभिमानाने म्हणाला.