
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईकरांना रेल्वे प्रवासात विघ्न उभे राहण्याची परंपरा कायम आहे. कुर्ल्याहून पनवेल आणि पनवेलहून कुर्ल्याला जाणारी वाहतूक पूर्ण पणे ठप्प झाली आहे. कुर्ला स्टेशनजवळ तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. सणासुदीलाच लोकलची वाहतूक विस्कळीत झाल्याने आज सकाळी मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा रेल्वे वाहतुकीला फटका बसला होता. त्यानंतर आता हार्बर लाईनवर वाहतूक खोळंबली आहे.
गेल्या अर्ध्या तासापासून कुर्ला स्थानकात फलाट क्र. 7 वर पनवेलला जाणारी लोकल उभी आहे. त्यामुळे कुर्ला स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे का ठप्प झाली याबाबतची कुठली ही माहिती रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना दिली जात नसल्याने प्रवाश्यां कडून प्रचंड संताप व्यक्त होत होता. काही वेळानंतर मात्र तांत्रिक बिघाडामुळे झाल्याची उद्घोषणा करण्यात आली.


























































