हार्बरचा प्रवास ‘धीम्या’ गतीनेच! वळणदार रुळांमुळे लोकलच्या वेगात खोडा

320

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर लोकलचा वेग वाढविण्याच्या प्रयत्नांना तांत्रिक कारणांनी अद्यापही यश येत नसल्याचे पुढे आले आहे. हार्बरचा मार्ग वळणदार असल्याने येथे लोकलचा वेग वाढविता येत नसल्याने हार्बरच्या प्रवाशांचे वेगवान प्रवासाचे स्वप्न अपुरेच असल्याचे चित्र आहे.

मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गाचे मेन, हार्बर आणि ट्रान्सहार्बर असे तीन मुख्य मार्ग आहेत. तर पश्चिम रेल्वेचा उपनगरीय मार्ग चर्चगेट ते विरार असा एकच मार्ग आहे. मध्य रेल्वेचा मुख्य मार्ग जलद अप व डाऊन मार्ग आणि धीम्या मार्गाचे अप व डाऊन असे एकूण चार मार्ग आहेत. शिवाय कुर्ला ते ठाणे आणि दिवा ते कल्याण अशा लांब पल्ल्यांच्या गाडय़ांसाठी पाचवी आणि सहावी मार्गिका तयार आहे, परंतु ठाणे ते दिवा या मधल्या टप्प्याचे पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच काम अद्यापही सुरू आहे.

हार्बर मार्गावर अप आणि डाऊन अशा धीम्या मार्गाच्या केवळ दोनच मार्गिका आहेत. त्यामुळे सीएसएमटी ते पनवेल मार्गिकेवर केवळ धीम्या लोकलच उपलब्ध आहेत. हार्बरवर जलद मार्ग बांधण्यासाठी सध्या जागा उपलब्ध नसल्याने निदान या मार्गावरच्या लोकलचा वेग तरी वाढविण्यात यावा अशी मागणी होत होती. परंतु सॅण्डहर्स्ट रोड ते रे रोडपर्यंत उन्नत (एलिव्हेटेड) स्वरूपाचा मार्ग असून तो अतिशय वळणदार असल्याने येथे लोकलचा वेग वाढविणे तांत्रिकदृष्टय़ा शक्य नसल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

फास्ट एलिव्हेटेड कॉरिडॉरही लटकला

भविष्यातील वेगवान प्रवासाचे स्वप्न दाखविणारा महत्त्वाकांक्षी सीएसएमटी ते पनवेल एलिव्हेटेड फास्ट कॉरिडॉरही मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि रेल्वे बोर्डाच्या टोलवाटोलवीत प्रचंड रखडल्याने नवी मुंबईत दिवसेंदिवस वाढणाऱया प्रवासी संख्येमुळे हार्बरचे प्रवासी मेटाकुटीला आले आहेत.

प्रस्ताव हेडक्वार्टरकडे पडून

मानखुर्द ते वाशी टप्प्यात लोकलचा वेग दर ताशी 80 ते 110 कि.मी. करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या डिव्हिजन कार्यालयाने मध्य रेल्वेच्या हेडक्वार्टरसमोर ठेवला होता, परंतु त्यास अद्यापही मंजुरी मिळाली नसल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या