आयपीएलची मस्ती उतरली..

यश नेहमीच दोष, अवगुण, चुकांना पाठीशी घालते, पण अपयश पदरी पडताच सर्व गोष्टी आपोआप फुगून वर येतात आणि मग त्या चुकांचादोषांचे पोस्टमॉर्टम केले जातो. दुबळय़ा विंडीजचा दौरा प्रयोगांचा दौरा होता. सरावाचा दौरा होता, पण टी-20 च्या मालिकेत आपला प्रयोग पूर्णपणे फसला. या दौऱयात खूप प्रयोग केले गेले, पण टी-20 कर्णधार हार्दिक पंडय़ाच्या मनमानीमुळेटीम इंडियाने मालिका गमावल्याचे बोलले जात आहे. आयपीएलच्या यशामुळे पंडय़ा स्टार झाला. त्या यशामुळे तो भलत्याच मस्तीत होता, पण त्याची मस्ती विंडीज दौऱयातील टी-20 मालिकेच्या अपयशाने जिरली.

दोन आठवडय़ांपूर्वी महान फलंदाज ब्रायन लारा म्हणाला, दहा संघ तयार होऊ शकतात, अशी गुणवत्ता हिंदुस्थानात आहे. पण त्यापैकी एक असलेल्या संघाला विंडीजसारख्या संघाने हरवले. हिंदुस्थानचे शेकडो खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात, आपली गुणवत्ता दाखवतात.  ती गुणवत्ता क्रिकेटच्या अनिश्चिततेपुढे आणि हिंदुस्थानी खेळाडूंच्या सातत्याच्या अभावामुळे तोंडघशी पडलीय आणि ती पाडलीय पंडय़ाने.

आपल्या बेशिस्त वागणुकीमुळे आणि अपयशी कामगिरीमुळे तो संघाबाहेर फेकला गेला होता. 2022 मध्ये तो ‘टीम इंडिया’त स्थान मिळविण्यासाठीही धडपडत होता. 2021 मधील टी-20 वर्ल्ड कपनंतर दुखापतीमुळे तो प्रदीर्घ काळ मैदानापासून दूर होता, मात्र गुजरात टायटन्स या आयपीएलमधील नव्या संघातून पुन्हा मैदानावर उतरलेल्या हार्दिकने दमदार अष्टपैलू कामगिरी केली. एवढेच नव्हे तर आपल्या संघाला चॅम्पियनही बनविले. आयपीएलमधील दमदार कामगिरीच्या जोरावर हार्दिक पंडय़ाने ‘टीम इंडिया’तही पदार्पण केले. काही सामन्यांसाठी त्याला प्रभारी कर्णधारपदही देण्यात आले. वेस्ट इंडीज दौऱयावरही टी-20 मालिकेसाठी ‘टीम इंडिया’च्या कर्णधारपदाची धुरा त्याच्याकडे होती. मात्र, त्याच्या मनमानी निर्णयामुळे रथी-महारथी खेळाडूंनी सजलेल्या ‘टीम इंडिया’ला विंडीजविरुद्धची टी-20 क्रिकेट मालिका 3-2 फरकाने गमवावी लागली.

युवा खेळाडूचे अर्धशतक हुकविले

हार्दिक पंडय़ाने चुकीचे निर्णय घेऊन संघाची वाट लावलीच; पण पदार्पणवीर 20 वर्षीय तिलक वर्माचे अर्धशतकही हुकवले. तिलक 49 धावांवर खेळत असताना हिंदुस्थानला विजयासाठी 14 चेंडूंत 2 धावांची गरज होती, मात्र तरीही हार्दिकने षटकार ठोकून सामना संपविला. खरंतर कर्णधार असलेल्या हार्दिक पंडय़ाने पदार्पणवीर तिलक वर्माला अर्धशतक साजरे करण्याची संधी द्यायला हवी होती. विजयी फटका खेळून या नव्या दमाच्या खेळाडूचे अर्धशतकही झाले असते अन् त्याचे मनोबलही उंचावले असते. त्यामुळे षटकार ठोकून सामना संपविणारा हार्दिक पंडय़ा सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला. पंडय़ाची मस्ती जिरली असली तरी तो या अपयशाला किती गांभीर्याने घेतो, हे महत्त्वाचे आहे.

चुकीच्या निर्णयाने पायावर धोंडा

हार्दिकने विंडीजविरुद्धच्या मालिकेत अनेक चुकीचे निर्णय घेतले, अर्थातच ते संघाच्या अंगलट आले. दुसऱया टी-20 सामन्यात युजवेंद्र चहलने 16 व्या षटकांत 2 बळी टिपले. खेळपट्टी फिरकीला साथ देत असताना 18 वे षटक पुन्हा चहलला देणे अपेक्षित असताना पंडय़ाने वेगवान गोलंदाजाला मोर्चावर आणले. याचबरोबर मुकेश कुमार व अक्षर पटेल या प्रमुख गोलंदाजांना 1-1 षटकच दिले. तिलक वर्मा व यशस्वी जैस्वाल या कामचलाऊ गोलंदाजांकडून 3 षटके करून घेतली. चहल महागडा ठरत असतानाही त्याचा कोटा पूर्ण करून घेतला. असे समजण्यापलीकडचे निर्णय घेऊन पंडय़ाने ‘टीम इंडिया’च्या पायावर धोंडा पाडून घेतला.

पहिले षटक स्वतःलाच

पंडय़ाने 5 सामन्यांच्या मालिकेतील 3 सामन्यांत पहिले षटक स्वतःच टाकले. तो चांगला गोलंदाज असला तरी तो स्विंग गोलंदाज नाहे. प्रतिस्पर्धी फलंदाजांना बुचकळय़ात टाकण्यासाठी कधी-कधी प्रमुख गोलंदाजाऐवजी फिरकी किंवा अष्टपैलू गोलंदाजाला पहिले षटक देण्याचा जुगार खेळला जातो, मात्र पंडय़ाने या मालिकेत स्वतःच पहिले षटक टाकण्याचा जणू नियमच केला होता. एवढेच नव्हे तर फलंदाजीतही तो अपयशी ठरला. पहिल्या दोन व नंतर पाचव्या सामन्यात त्याला स्वतःची क्षमता दाखविण्याची पूर्ण संधी त्याने दवडली. हार्दिकने पाचव्या व निर्णायक सामन्यात 14 धावा करण्यासाठी 18 चेंडू खाल्ले. स्ट्राईकही रोटेट करण्यात तो अपयशी ठरल्याने हिंदुस्थानला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही.

मुकेशअक्षरचा योग्य वापर नाही

मुकेश कुमार हा स्विंग गोलंदाज आहे. तिसऱया एकदिवसीय सामन्यात त्याने विंडीजची आघाडीची फळी कापून आपली क्षमता दाखवून दिली होती, मात्र टी-20 मालिकेत सलामीचा सामना सोडल्यास त्याला इतर लढतीत पुन्हा नवा चेंडू मिळालाच नाही. अखेरच्या तीन सामन्यांत तर तो पाचव्या अन् सहाव्या क्रमांकावर गोलंदाजीसाठी आला. अक्षर पटेलला तर संपूर्ण मालिकेत केवळ 11 षटकेच गोलंदाजी मिळाली. संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू असूनही अक्षरचा कर्णधाराला योग्य वापर करता आला नाही. परिणामी विंडीजच्या फलंदाजांनी हिंदुस्थानी गोलंदाजी निष्प्रभ ठरविली.