
सामना ऑनलाईन, हरदोई
भाजप नेते नरेश अग्रवाल यांचा मुलगा नितीन याने देवळामध्ये दारू वाटल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील हरदोईमधल्या श्रावण देवी मंदिरात ‘पासी’ समाजाच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये आलेल्या सगळ्या भक्तांना जेवणाचे बॉक्स देण्यात आले होते. हे बॉक्स उघडल्यानंतर भाविकांना आश्चर्याचा धक्काच बसला कारण या बॉक्समध्ये दारूच्या बाटल्याही ठेवण्यात आल्या होत्या. लहान मुलांना मिळालेल्या बॉक्समध्येही या दारूच्या बाटल्या मिळाल्याने भाविक आणखीनच संतापले आहेत.
नरेश अग्रवाल हे समाजवादी पक्षाचे नेते होते, ज्यांनी मार्च 2018 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या मुलाने म्हणजेच नितीन अग्रवालने हा मेळावा आयोजित केला होता. नितीन मंचावर उभा राहून सरपंचांना सूचना देत होता की कार्यक्रमानंतर सरपंचांनी त्यांच्या गावातल्या लोकांना खाण्याचे बॉक्स मिळतायत की नाही याकडे लक्ष द्यावं. हा प्रकार भाजपचे खासदार अंशुल वर्मा यांना अजिबात आवडलेला नाही. वर्मा यांनी या प्रकाराची माहिती वरिष्ठांना देण्याचं ठरवलं आहे. उत्पान शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावर दारू विकत घेऊन ती विकली जाते हे कळालं कसं नाही असा प्रश्नही वर्मा यांनी उपस्थित केला आहे.





























































